महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुन । सरकारने २००० रुपयांच्या नोटा परत घेतल्याने अर्थव्यवस्थेत तेजी येण्याची अपेक्षा आहे. ५५,००० कोटी रुपयांची अतिरिक्त ग्राहक मागणी निर्माण होऊ शकते, असा दावा एसबीआय रिसर्चने आपल्या ताज्या इकोरॅप अहवालातून केला आहे. यामुळे खर्च आणखी वाढू शकतो, असे म्हटले जात आहे.
जमा करण्याऐवजी या नोटांचा वापर सोने, दागिने, एसी, मोबाइल फोन, रिअल इस्टेट आदी मोठ्या खर्चासाठी केला जाऊ शकतो. पेट्रोल पंपांवर नगदी पेमेंटने खरेदी, मंदिरांमध्ये दानही वाढण्याची शक्यता आहे. अहवालात म्हटले आहे की, या निर्णयामुळे मायक्रो इकॉनॉमिक मापदंडांमध्ये सुधारणा होईल. तसेच बँक ठेवी, कर्जाची परतफेड, खर्च व एकूणच अर्थव्यवस्थेला वेग येईल.
५०% नोटा सिस्टिममध्ये परत
नोटा परत घेण्याच्या घोषणेनंतर १.८ लाख कोटी किमतीच्या २००० च्या सुमारे ५०% नोटा बँकिंग सिस्टिममध्ये परत आल्या आहेत. यासोबतच लोकांकडील रोख रक्कम ८३ हजार कोटींनी कमी होऊन ३२.८८ लाख कोटी राहिली आहे. साधारणत: बोहनीच्या या मोसमात रक्कम काढल्यामुळे चलनातील नोटांमध्ये वाढ झाली आहे.
१.८ लाख कोटींनी वाढल्या बँक ठेवी
दोन जूनपर्यंत संपलेल्या पंधरवड्यात बँकांतील एकूण ठेवींमध्ये ३.३ लाख कोटींची वाढ झाली. गेल्या २ वर्षांत या काळात सरासरी १.५ लाख कोटींची वाढ झाली होती. याआधारे बँकांत १.८ लाख कोटी अतिरिक्त ठेवी आहेत.