महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुन । आषाढ महिना सुरू झाला आहे वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठल आणि रखुमाईच्या भेटीचे वेध लागले आहे. दरम्यान एकादशीच्या निमित्ताने पारंपरीक पूजा, विधी सुरू झाल्या आहेत. आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाच्या पदस्पर्श आणि मुख दर्शनाचा लाभ घेता येईल यासाठी आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करून 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात येणार आहे.
आज सकाळी अकरा वाजता विठ्ठल राखुमाई यांचा पलंग काढण्यात येणार असून आषाढी यात्रा संपेपर्यंत देव झोपायला जाणार नाहीयेत. देवाचा पलंग निघतो म्हणजेच देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते.
आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणीचा शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो यामुळे देवाची झोप बंद होते अशी प्रथा आहे. त्यानुसार आता 7 जुलै पर्यंत मंदिर 24 तास खुले असणार आहे.
देवाचा पलंग निघाल्यामुळे आता दिवसभरात सकाळी देवाचे स्नान नित्यपूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी एवढ्याच साठी दर्शन बंद राहणार आहेत. उरलेल्या सर्व वेळात दिवसरात्र देव अखंड दर्शनासाठी उभा असणार आहे. आता आषाढी यात्राकाळात आजपासून मंदिर 24 तास दर्शनासाठी उघडे राहणार आहे. यामुळे यात्राकाळात तासाला अडीच ते तीन हजार भाविकांचे दर्शन होत असल्याने दिवसभरात लाखभर भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ मिळू शकणार आहे.
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक येत असतात. यावेळी मोठी गर्दी होऊन प्रत्येकाला पदस्पर्श दर्शन घेता येत नाही. त्यामुळे मंदिर समितीने प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावे यासाठी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 20 ते 7 जुलै दरम्यान विठ्ठल मंदिर चोविस तास तास खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.