Satara :उदयनराजेंचा थेट शिवेंद्रराजेंना इशारा ; माझ्या जागेत पाय ठेवाल …….

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुन । संभाजीनगरची ती जागा माझ्या मालकीची असून, तेथे सगळी कुळे आहेत. मार्केट कमिटीचा या जागेशी काहीही संबंध नाही. पोलिस खाते शिवेंद्रसिंहराजेंच्या (Shivendraraje Bhosale) दबावाखाली एकतर्फी काम करत आहे. माझ्या जागेत शेड कशासाठी? माझ्या जागेत पाय ठेवायचा त्यांना अधिकार नाही.

असा सज्जड दम भरत आम्ही मार्केट कमिटीवर व पोलिसांवरही ट्रेस पासिंग आणि न्यायालयाचा अवमान केल्याबद्दलची केस दाखल करणार आहोत. यासाठी वरिष्ठ वकिलांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी दिली.


उदयनराजे म्हणाले, ‘‘ही माझ्या मालकीची जागा असून, येथे कुळ असून, त्यांची जागा आहे. अचानक या लोकांना दृष्टांत झाला. त्यांना वाटले, की या जागेचा कब्जा घ्यावा. संपूर्ण पोलिस विभाग (Satara Police) मार्केट कमिटीच्या बाजूने व शिवेंद्रसिंहराजेंच्या दबावाखाली चालत आहे. माझ्या जागेत पाय ठेवायचाही त्यांना अधिकार नाही. माझ्या जागेत पाय ठेवल्यास तंगडे तोडणार आहे. मार्केट कमिटीने बैल बाजार विकून टाकला. लोकांच्या जागा घ्यायच्या. प्लॉटिंग करून विकून टाकायची, हे त्यांचे काम आहे.

त्याकाळी अभयसिंहराजे पालकमंत्री असल्याने ते सर्व अधिकाराचा वापर करत होते. सहकारात सर्वाधिक भ्रष्टाचार होत आहे. मोठ्या प्रमाणात सहकारी संस्था अडचणीत आलेल्या आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांची चेन आहे, त्यावर नियंत्रण आणले गेले पाहिजे. आम्ही प्लॉट पाडून पैसा कमविणार, असा आरोप वारंवार होतोय; पण त्यांना थोडी बुद्धीची उंची लागते. ती त्यांच्याकडे दुर्दैवाने नाही.

तसे असते तर मी यांच्याबरोबर हात मिळवणी करून तुम्हाला पाहिजे ते घ्या मला माझे द्या, असे झाले असते. त्यांचा प्रस्ताव आला होता, तो मी अमान्य केला. या भागाच्या विकासासाठी ही जागा वापरली गेली पाहिजे, हे माझे प्रामाणिक मत आहे. त्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही. पोलिसही त्यांच्या बाजूने आहेत. पोलिसांचा वापर ताबा घेण्यासाठी करत असतील तर हा नवीन पायंडा म्हणावा लागेल.

न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने नाही. ते काहीही बोलतील. त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही. आम्ही कागदपत्रे दाखवली आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात ट्रेस पासिंग, कंटेम्‍प्ट ऑफ कोर्ट आदी केसेस दाखल करणार आहोत. आमदारांबरोबर आलेल्या लोकांना काहीही सोयरं ना सुतक. शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितले म्हणून आम्ही आलो, असे सांगून त्यांची टिंगलटवाळकी चालली होती. बळाचा वापर पोलिसांनी केला.

नारळ ठेवला, फटाके वाजविले म्हणजे भूमिपूजन झाले असे नाही. हे सगळे काळे धंदे करणारे लोक आहेत. मनवेसारखा माणूस दोन आणि तीन-चार कोटींचा बंगला बांधतो. एखादा उद्योजक बंगला बांधू शकत नाही, तेवढा याचा बंगला आहे. मुळात सहकार विभागच भ्रष्ट आहे. वरपर्यंत खालपर्यंत सगळी लिंक असते. आयुक्तांकडे हे प्रकरण गेले, की त्यांच्या मनासारखे झाले नाही तर अधिकाऱ्यांवर शेकते. १८५७ मध्ये जे बंड झाले तसेच बंड आता पुन्हा देशात होईल, असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले.

ही जागा प्लॉट पाडून विकायचा उद्योग असल्याचा आरोप आमदार करत आहेत, याविषयी विचारताच उदयनराजे म्हणाले, ‘‘आम्ही भूमिपूजन केलं ते लोकांच्या हितासाठी आहे. एमआयडीसीत जाऊन पाहा, निम्म्याच्यावर त्यांनी प्लॉटिंग केले आहेत. आम्ही बोलत नाही, त्यांना काय बोलायचे ते बोलू देत; पण ही जागा माझी आहे. शिवेंद्रसिंहराजे व मार्केट कमिटीचा काहीही संबंध नाही.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *