मान्सूनच्या आगमनाने मावळात वर्षाविहारासाठी गर्दी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुन । मावळ तालुक्यात मान्सूनच्या पावसाचे आगमन होताच वर्षाविहारासाठी येणार्‍या पर्यटकांची प्रचंड गदी पर्यटनस्थळी येेऊ लागली आहे. यामुळे परिसरात वाहतूककोंडी होत असल्यामुळे चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पर्यटनस्थळे गजबजली
शनिवारपासून मावळ तालुक्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. मावळ तालुका हा पर्यटनस्थळासाठी प्रसिद्ध असलेला तर आहेच. शिवाय डोंगरदर्‍या आणि लेण्या, गडकिल्ले यासाठीही प्रसिद्ध आहे. तसेच, मान्सूनचा पाऊस जोरात पडत असल्याने याठिकाणी वर्षा विहारासाठी मोठ्या संख्येने पुणे, मुंबईचे पर्यटक येत असतात. शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी मावळातील पर्यटनस्थळे गर्दीने गजबजून जातात.

व्यावसायिकही सुखावले
मावळ तालुक्यातील सह्याद्री पर्वताच्या रांगा त्यावरील लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा किल्ला याशिवाय कार्ले, भाजे, बेडसे या लेण्या, एकवीरादेवी मंदिर, प्रतिशिर्डी, घोरावडेश्वर डोंगर व मंदिर, भंडारा डोंगर व संत तुकाराम महाराजांचे मंदिर, कुंडमळा त्याचप्रमाणे पवना धरण, वडिवळे धरण, आंर्द्रा धरण, आदीमुळे हजारोंच्या संख्येने पर्यटक हौसमौजेसाठी येत आहेत. त्यामुळे व्यावसायिकही सुखावले आहेत.

शनिवारी मावळात मान्सूनचा पाऊस सुरू झाला. शनिवार, रविवार सुटी असल्याने अनेकांनी पहिल्याच पावसात भिजण्यासाठी आणि वर्षा विहारासाठी मावळात धाव घेतली होती. हजारोंच्या संख्येने पर्यटक आल्याने पर्यटनस्थळी व्यवसाय करणार्‍यांनी पर्यटकाचे जोरदार स्वागत केले. पहिल्या पावसाने हॉटेलवाले, फेरीवाले, हातगाडीवाले, तसेच चहावाले, रिक्शावाला यांचाही चांगला व्यवसाय झाल्याने ते खूश दिसत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *