महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुन । Ashes 2023 Lord’s Test : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या ॲशेस मालिकेतील दुसरा सामना बुधवारपासून (दि. 28) लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी यजमानांनी मंगळवारी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. मोईन अलीला दुखापतीमुळे लॉर्ड्स कसोटीतून बाहेर काढण्यात आले असून त्याच्या जागी जोश टँगची निवड करण्यात आली आहे. पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
जोश टंगने अलीकडेच आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीत पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने दुस-या डावात 5 विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली होती. त्या सामन्यात इंग्लंडने आयर्लंडचा 10 गडी राखून पराभव केला होता. टंगने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप छाप पाडली आहे. त्याने आतापर्यंत एकूण 48 प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात 167 विकेट घेतल्या आहेत. ‘लिस्ट-ए’च्या सामन्यांत त्याने 15 सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत. (Ashes 2023 Lord’s Test)
📋 We can confirm our team for the second Ashes Test match at Lord's.
Congratulations, Josh Tongue 🤝 #EnglandCricket | #Ashes
— England Cricket (@englandcricket) June 27, 2023
एजबॅस्टन कसोटीदरम्यान मोईन अलीच्या बोटाला दुखापत झाली होती त्यामुळे त्याला गोलंदाजी करण्यात अडचण येत होती. दरम्यान, मोईनच्या जागी 18 वर्षीय रेहान अहमदचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला असला तरी त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. याशिवाय संघात कोणतेही मोठे बदल झालेले नाहीत. (Ashes 2023 Lord’s Test)
मोईनने दोन वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली होती, पण कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या सांगण्यावरून त्याने निवृत्ती मागे घेत पुन्हा इंग्लंडकडून कसोटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, लॉर्ड्सची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकते. या खेळपट्टीवर पहिल्या दोन डावांची सरासरी धावसंख्या 300 च्या जवळपास आहे. अशा परिस्थितीत हवामानाने सहकार्य केल्यास दोन्ही संघातील वेगवान गोलंदाज कमाल करतील. त्यामुळे इंग्लंडने अतिरिक्त वेगवान गोलंदाज म्हणून जोश टँगची संघात निवड केल्याचे संघ व्यवस्थानाने म्हटले आहे. या सामन्यात स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर 5व्या वेगवान गोलंदाजाची भूमिका स्वत: कर्णधार स्टोक्स निभावेल.
हवामान कसे असेल?
लॉर्ड्सवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. विशेषत: तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, दिवसाचे तापमान 22 ते 24 अंशांच्या आसपास असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग इलेव्हन :
बेन डकेट, जॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), स्टुअर्ट ब्रॉड, ऑली रॉबिन्सन, जोश टंग, जेम्स अँडरसन