महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुन । धन्य माझी भक्ती धन्य माझा भाव, हृदयी पंढरीराव राहतसे ! सावळ्या विठ्ठलावर असणाऱ्या श्रद्धेपोटी शेकडो किलोमीटर पायपीट करून अपार यातना झेलून पंढरीत आलेल्या लाखो भाविकांनी भूवैकुंठ पंढरीची दिवाळी गजबजून गेली आहे. आषाढी यात्रेसाठी पंढरीत १० लाखांवर वैष्णवांची मांदियाळी जमली असून शुक्रवारी यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पाऊस नसल्याने वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. गेल्या वर्षी कोरोनानंतरची पहिली वारी असल्याने १४ लाख वारकरी पंढरीत दाखल झाले होते. यंदा ही संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
आषाढी यात्रेसाठी बुधवारी पंढरीत संत ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका, रुक्मिणी माता अशा मानाच्या पालख्यांसह इतर संतांचे शेकडो पालखी सोहळे, हजारो दिंड्या दाखल झालेल्या आहेत. पंढरीच्या चारही दिशांनी वैष्णवांची गर्दी झाली आहे. चंद्रभागा वाळवंट, ६५ एकर मैदान, दर्शन रांग, विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग वारकऱ्यांच्या गर्दीने, टाळ, मृदंगाचा गजर आणि भजन, कीर्तनाने भारावून गेले आहे.
दर्शनरांगेत दीड लाखावर भाविक : २२ तासांची प्रतीक्षा दररोज ५० हजारांवर भाविकांना दर्शन : श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत दीड लाखाहून अधिक भाविक आहेत. दर्शन रांग बुधवारी सायंकाळी गोपाळपूरपर्यंत पोहोचली असून दर्शनासाठी २२ तासांचा अवधी लागतो आहे. दरम्यान, दर्शन रांगेत सर्व सुविधा दिल्या गेल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.
वारकरी मठ, फडावर पिशवी ठेवताच थेट विठ्ठल दर्शनासाठी धाव घेत आहेत. त्यामुळे दर्शन रांगेतील गर्दी दोन दिवसांपासून वाढत आहे. दर्शन रांगेतील सर्व १० पत्राशेड भरलेले आहेत आणि रांग मंगळवेढा रोडवरून थेट गोपाळपूर चौकापर्यंत पोहोचली आहे. रांगेत जवळपास दीड लाखावर भाविक असतील, असा दावा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सूत्रांनी केला आहे.
दर्शन रांगेतील भाविकांना दर्शन घेण्यासाठी २० ते २२ तासांचा अवधी लागतो आहे. यादरम्यान भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी, चहा, नाश्ता, जेवण, शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. घुसखोरी होऊ नये यासाठी संपूर्ण रांगेत पोलिस बंदोबस्त आहे. पत्राशेड येथे किमान ४० हजारांवर भाविक आहेत. त्यांच्या सोयीसाठी फायबरची शौचालये उभारण्यात आली आहेत. रांगेत जागोजागी आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. प्रथमोपचार केंद्रेही आहेत. निराधार निवास येथे तात्पुरते रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.
दर्शनरांगेत एलईडीवर लाइव्ह दर्शन
दर्शनरांगेत तीन ठिकाणी दहा बाय दहा आकाराचे एलईडी स्क्रीन लावले आहेत. त्यावर श्री विठ्ठल मंदिरातील दृश्ये लाइव्ह दाखवली जात आहेत. त्यामुळे रांगेतील भाविकांना २२ तासांचा प्रतीक्षा कालावधी सुसह्य वाटतो आहे.
मुखदर्शन रांगही लांबली
पदस्पर्श दर्शनरांगेत भाविकांची गर्दी वाढल्याचे पाहून भाविक मुखदर्शन रांगेकडे धाव घेत आहेत. त्यामुळे मुखदर्शन रांगेतील भाविकांची संख्या वाढली असून ही रांगही प्रदक्षिणा मार्गावर आलेली आहे. १० ते १५ हजार भाविक या रांगेतही उभे असतील.