पुणे शहरात दुसर्‍या दिवशीही संततधार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुन । मंगळवारपाठोपाठ बुधवारीही शहरात संततधार पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात बहार आली. मात्र, रिपरिप पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रस्ते निसरडे झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. बुधवारी सायंकाळी 6 पर्यंत शिवाजी नगरात 9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

लवासा भागात 24 तासांत 107 मिलिमीटर पाऊस पडला. शहरात मंगळवारी सकाळी सहा ते रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी छोटी-छोटी डबकी तयार झाली. शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये पाणी साचलेले आहे. शिवाजी रस्ता, बुधवार पेठ, रेल्वे स्टेशन परिसर, सातारा रस्ता, कोथरूड, वाकडेवाडी, पर्वती भाग, स्वारगेट परिसरात चिखल झाला आहे. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने शहरात गारवा जाणवत होता. दुपारी तीननंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली व ऊन पडले. पुन्हा सायंकाळी 5 वाजता शहरावर ढगांची गर्दी झाल्याने वातावरणात गारवा पसरला. सायंकाळी 6 नंतर पाऊस पूर्ण थांबला होता.

शहरात 67.7 मि.मी. पाऊस
शहरात मंगळवारपर्यंत 58 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. बुधवारी त्यात 9 मि.मी. पावसाची भर पडून 67.7 मि.मी. पावसाची नोंद झाली. शहराची 28 जूनपर्यंतची सरासरी 139 मि.मी. इतकी असून, 71 मि.मी. पावसाची तूट आहे.

बुधवारी झालेला पाऊस (मि.मी.)
शिवाजीनगर 9, पाषाण 13, कोरेगाव पार्क 6.5,
बालेवाडी 6.5, चिंचवड 5.5, हडपसर 3.5, लवळे 0.5

लवासात अतिवृष्टी
लवासा भागात 24 तासांत 107 मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली असून, मंगळवारी 75, तर
बुधवारी 32 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *