Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुन । पवित्र अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून सुरू होत आहे. यंदाही अमरनाथ यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. अमरनाथ यात्रेकरुंच्या (Amarnath Yatra 2023) सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज झालं आहे. जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या हस्ते भाविकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी दोन रुग्णालयांचे उद्घाटन करण्यात आलं आहे. बालटाल आणि चंदनवारी येथे ही दोन 100 खाटांची रुग्णालये बांधण्यात आली आहेत. DRDO ने बांधलेली ही रुग्णालये प्रवाशांना सर्व संभाव्य आरोग्य सुविधा पुरवतील. ही रुग्णालये 15 दिवसांच्या विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली आहेत.

अमरनाथ यात्रेकरूंसाठी 100 खाटांची दोन रुग्णालये सज्ज
अमरनाथ यात्रा 2023 सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना, जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी बुधवारी (29 जून) यात्रेकरूंसाठी व्हर्च्युअल मोडद्वारे बेस हॉस्पिटलचे उद्घाटन केलं. अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून सुरू होणार असून ती 30 ऑगस्टला रक्षाबंधनाला संपणार आहे. 15 दिवसांच्या विक्रमी वेळेत रुग्णालयांचे बांधकाम पूर्ण केल्याबद्दल DRDO, सर्व संबंधित अधिकारी, अभियंते आणि कर्मचार्‍यांचे अभिनंदन केलं. यावेळी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, दोन बेस कॅम्पवर कायमस्वरूपी रुग्णालये बांधण्यासाठी प्रस्ताव आहे. बेस कॅम्पमध्ये कायमस्वरूपी उभारल्यामुळे यात्रेकरुंना आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होईल.

लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या हस्ते उद्घाटन
लेफ्टनंट गव्हर्नर सिन्हा यांनी याबद्दल पंतप्रधान मोदी आणि आरोग्य मंत्रालयाचे आभार मानले. DRDO द्वारे बांधलेली दोन तात्पुरती अत्याधुनिक रुग्णालये अमरनाथ यात्रेकरू आणि यात्रा व्यवस्थापनाला 24 तास उत्तम आरोग्य सुविधा प्रदान करण्यात मदत करतील, असंही त्यांनी सांगितलं आहे. ते पुढे म्हणाले की, अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालटाल आणि चंदनवाडी रुग्णालये अत्याधुनिक उपकरणे, डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र ब्लॉक, आयसीयू वॉर्ड, ऑक्सिजनयुक्त वॉर्ड आणि ट्रायज एरिया आणि सर्व गंभीर वैद्यकीय सेवेसाठी इतर आवश्यक साहित्याने सुसज्ज आहेत.

बालटाल आणि चंदनवाडी येथे दोन तात्पुरती रुग्णालये
अमरनाथ श्राइन बोर्डाचे प्रमुख असलेले लेफ्टनंट गव्हर्नर यांनी अधिकाऱ्यांना रुग्णालयांमध्ये आणि आसपासच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितलं की, भाविकांची यात्रा अधिक सोयीस्कर आणि त्रासमुक्त करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. एलजी मनोज सिन्हा यांनी डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचार्‍यांना निष्ठेने यात्रेकरुंची सेवा करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी यात्रेकरूंना आणि संपूर्ण व्यवस्थापन टीमला आरोग्य, आनंद आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या. रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याला एलजी मनोज सिन्हा, काश्मीरचे विभागीय आयुक्त श्री विजय कुमार बिधुरी, श्री अमरनाथ जी श्राइन बोर्ड, DRDO आणि मुख्य सचिव डॉ. अरुण कुमार मेहता तसेच प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *