महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुन । बाबा अमरनाथ यात्रा १ जुलैपासून सुरू होत आहे. ६२ दिवस चालणारी ही यात्रा दोन श्रावण मासांमुळे यंदा सर्वात दीर्घ असेल. भाविक पोहोचत आहेत. हेच भाविक पहिल्या जथ्थ्याच्या रूपात ३० जून रोजी रवाना होतील आणि १ जुलैला दुपारी पवित्र बाबा बर्फानीचे दर्शन घेतील. यात्रा सुरू होण्यापूर्वी दिव्य मराठीने बेस कॅम्प बालटाल येथे पोहोचत तयारीचा आढावा घेतला आहे. बालटालहून जाणारा छोटा रस्ता यंदा खूप विकसित झाला आहे. १६ किमीच्या या मार्गावर १० किमी कच्चा-पक्का रस्ता तयार झाल्याने मार्ग सुकर झाला आहे. तथापि, ६ किमी रस्ता अद्याप अरुंद आहे. यात्रेची सुरक्षा पाच थरांमध्ये विभागली आहे. गुहेजवळ प्रथमच आयटीबीपीने आघाडी उघडली आहे.
यात्रेसाठी सर्वप्रथम श्रीनगरला यावे लागेल. तेथून टॅक्सीद्वारे सुमारे १०० किमी दूर बालटालला पोहोचावे लागेल. बालटालहून गुहेकडे जाणारा सुरुवातीचा ८०० मीटर डांबरी रस्ता तयार आहे. पुढे २ किमी डोमेलपर्यंत पेव्हर ब्लॉकचा रस्ता बनवला आहे. दोन्ही रस्ते पुरेसे रुंद आहेत. डोमेलहून पुढे बराडीपर्यंत ८ किमी रस्ता कच्चा असला तरी तो रुंद करण्यात आला आहे आणि चांगला आहे. त्याच्या पुढे सुमारे ५ किमी रस्ता थोडा खडतर आहे. येथे उतारासह कठीण चढाईदेखील आहे.
यंदा आठ किमीपर्यंतच मिळणार आहेत लंगर
गेल्या वर्षी बालटालहून गुहेपर्यंत १६ किमीच्या संपूर्ण भागात लंगर लागले होते. त्याच वेळी ढगफुटी झाल्याने अपघात घडला होता. म्हणून यंदा बालटाल ते गुहेच्या पहिल्या बराडीपर्यंत ७ ते ८ िकमी पर्यंतच लंगरला परवानगी देण्यात आली आहे. त्याच्या पुढील ८ किलोमीटरमध्ये लंगर नसतील.
चांगले ऊन पडत असेल तरी रेनकोट तयार ठेवा
बालटालहून जाताना चांगले ऊन पडत असेल तर पुढे हवामान स्वच्छ राहील, या भ्रमात राहू नका. १५-१६ दिवसांपासून येथे राहणारे लोक म्हणाले, एक-दीड तासातच हवामान बदलते. मुसळधार पाऊस सुरू होतो. तो अर्धा ते एक तास चालतो. त्यानंतर उघडीप मिळते.
पहलगामहूनही गुहेत जाता येईल, पण हा रस्ता ३२ किमी लांब
यंदा अमरनाथ यात्रा पूर्णपणे तंबाखूमुक्त राहणार आहे. सर्व थांब्यांवर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असेल. अति जोखमीच्या अडीच किमी मार्गावरील सर्व प्रवाशांना हेल्मेट घालणे अनिवार्य असेल. ते मोफत उपलब्ध होतील.