महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । `बाझबॉल`च्या (आक्रमक पवित्रा) नादात पहिला अॅशेस कसोटी सामना गमावणाऱ्या इंग्लंडला आता दुसऱ्या कसोटी सामन्यात जिंकण्यासाठी शर्थ करावी लागणार आहे. ३७१ धावांच्या आव्हानासमोर त्यांची चौथ्या दिवस अखेर ४ बाद ११४ अशी अवस्था झाली.
मिचेल स्टार्कने आपल्या सलग दोन षटकांत झॅक क्रॉली आणि ऑली पोप यांना बाद करून सामन्यात सनसनाटी निर्माण केली. इंग्लंडची अवस्था त्यावेळी २ बाद १३ अशी झाली होती. ज्यो रूटकडून मोठ्या अपेक्षा असताना त्याने निराशा केली. पॅट कमिंसने रूट आणि हॅरी ब्रुक यांना एकाच षटकांत बाद केले तेव्हा इंग्लंडने चौथा फलंदाज ४५ धावांवर गमावला होता.
बेन डकेट आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी अर्धशतकी भागीदारी करुन इंग्लंडचा डाव सावरला आहे. आज अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी आणखी २५७ धावांची गरज आहे. पहिल्या डावात ९१ धावांनी पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला २७९ धावांत गुंडाळले तरी भलेमोठ्या धावांचे आव्हान त्यांना मिळालेच.
ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने ७७ धावा केल्या तो बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद १८७ धावा झाल्या होत्या त्यानंतर इंग्लंड गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया फलंदाजांवर अंकूश लावला. पायाला दुखापत झाल्यामुळे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी न करु शकलेला नॅथन लायन लंगडतच फलंदाजीस उतरला होता त्याने स्टार्कसह अखेरच्या विकेटसाठी १५ धावांची भागीदारी केली.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया, पहिला डाव ः ४१६ आणि दुसरा डाव ः २७९ (उस्मान ख्वाजा ७७, डेव्हिड वॉर्नर २५, मार्नस लाबूशेन ३०, स्टीव स्मिथ ३४, अॅलेक्स केरी २१, स्टूअर्ट ब्रॉड ६५-४, जॉस टाँग ५३-२, रॉबिन्सन ४८-२). इंग्लंड, पहिला डाव ः ३२५ आणि दुसरा डाव ः ४ बाद ११४ (बेन डकेट खेळत आहे ५०, बेन स्टोक्स खेळत आहे २९, मिचेल स्टार्क ४०-२, पॅट कमिंस २०-२)