महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । पहाटेच्या शपथविधीआधीच शरद पवारांनी माघार घेतल्याने अजित पवार फसले होते. नेमके किती आमदार घेऊन बंड पुकारावे लागते, किती आमदारांच्या फुटीला न्यायालयाची मान्यता मिळू शकते, असा प्रश्न तेव्हा त्यांच्यापुढे होता. त्यामुळे त्यांनी पुढे पावले उचलली नव्हती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडून मुख्यमंत्रिपद मिळवले. एवढेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बंडखोर आमदारांचा फैसला विधानसभा अध्यक्षांच्या हाती राहील, असेही स्पष्ट झाले. त्या निर्णयानुसार शिंदेंच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी हालचाली केल्या. आधी विश्वासू आमदारांच्या भेटीगाठी घेतल्या. पूर्ण व्यूहरचना केली. दोन तृतीयांश आमदारांना सोबत घेतले. राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांच्या सहीने राज्यपालांना पत्र दिले.