दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून थेट शिंदे गटाला अस्वस्थ करणारा सवाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून थेट शिंदे गटाला निशाण्यावर घेण्यात आलं आहे. अजित पवार यांनी काल उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी शिंदे टोळीचे चेहरे काळे ठिक्कर पडले होते. राष्ट्रवादीमुळे आम्ही शिवसेनेला सोडलं. अजित पवार आमच्या मतदारसंघात घुसखोरी करत होते. आमचे मतदारसंघ गिळंकृत करत होते. त्यामुळे पुढच्यावेळी आम्ही निवडूनही आलो नसतो. अजित पवार आम्हाला निधीही देत नव्हते. अशाने शिवसेनाच संपुष्टात येणार होती, असा दावा शिंदे गटाने केला होता. आता ते काय करतील? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

नशीबच फुटले
अजितदादांच्या नावाने आकांडतांडव करणारे आता काय करणार? असा थेट सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. अजित पवार आता सरकारमध्ये आले आहेत. निधीचे वाटप करणारे अर्थ खातेही त्यांच्याकडे आले आहे. हा शिंदे गटाच्या आमदारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. ज्यांनी स्वाभिमानासाठी शिवसेना सोडत असल्याच्या बतावण्या केल्या त्यांचे आता नशीबच फुटले आहे. त्यांचे नकली हिंदुत्वही संपले, असा हल्ला अग्रलेखातून चढवण्यात आला आहे.

एक मिंधे जाऊन दुसरे येणार
शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची तलवार कोसळण्याचा दिवस जवळ आला हा खरा कालच्या शपथविधीचा अर्थ आहे. एक मिंधे जाऊन आता दुसरे येणार आहेत. यातून राज्याला काय मिळणार आहे? असा सवाल करतानाच महाराष्ट्राचे राजकारण खालच्या पातळीवर गेले आहे. ते पाहून मन विषण्ण होते. महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि वैभवाला व्यापारी राजकारणाची दृष्ट लागल्याचंही अग्रलेखातून म्हटलं आहे.

म्हणून बंड
याच अग्रलेखातून अजित पवार यांनी बंड का केलं यावरही भाष्य करण्यात आलं आहे. अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे. छगन भुजबळ जामिनावर आहेत. हसन मुश्रीफांवर ईडीच्या अटकेची तलवार आहे. ते सुद्धा हंगामी जामिनावर आहेत. सुनील तटकरे यांचे पायही खोलात आहेत. सगळ्यांची प्रगती पुस्तके तपास यंत्रणांच्या शेऱ्यांनी भरलेली आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्यावर इक्बाल मिर्चीशी व्यवहार केल्याचा आरोप असून त्यांची संपत्ती जप्त केलेली आहे. आता पटेल यांची संपत्ती मोकळी होईल आणि ते केंद्रीय मंत्री होईल, असं सांगत या सर्व कारणांमुळेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्याचा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *