महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । समृद्धी महामार्गावर नांदेडहून मुंबईकडे निघालेली कार दुभाजकावर आदळून रविवारी झालेल्या अपघातात येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मोहम्मद जावेद अख्तर (५१), त्यांची पत्नी शमीम (४८) आणि मुलगा अक्रमुद्दिन (२२) अशी मृतांची नावे आहेत. रविवारी दुपारी ते कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ पोहोचताच त्यांची मोटार दुभाजकावर धडकली.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर रविवारी दुपारी कंटेनर ट्रॅक्टरला धडकल्याने दोन मजूर जखमी झाले. महामार्गाच्या नागपूर प्रवेशद्वारावर ते गवत कापत होते. गवत ठेवण्यासाठी तेथे ट्रॅक्टर उभा होता. ट्रॅक्टरला कंटेनरने धडकल्याने दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना एम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
* समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अपघातातील २४ मृतदेहांवर रविवारी बुलढाणा येथे सामुदायिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी उपस्थित नातलगांच्या आक्रोशाने वातावरण शोकाकुल झाले होते.
* संगम तलावनजीक स्मशानभूमीत झालेल्या अंत्यसंस्कारांना मंत्री, अधिकारी उपस्थित होते. मृतांचे नातलग अन्य गावांमधून आले असल्यामुळे रविवारी लगेचच त्यांना अस्थिकलश सोपविण्यात आले. *नागपूर येथील झोया (गुडिया) शेख हिचा दफनविधी मलकापूर राज्यमार्गावरील कब्रस्थानात झाला.