महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह भाजप-शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा दिल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना-भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादीने त्यांच्या जागी आमदार जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे. या घडामोडींमुळे महाविकास आघाडीतही अस्वस्थता पसरली आहे.
अजित पवार यांनी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. हा दावा खरा निघाला तर शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ 13 आमदार राहतील. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कुणाला मविआतील कोणत्या पक्षाला मिळणार, यावरुन चर्चा रंगली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणी काँग्रेसलाच हे पद मिळेल, असा दावा केला आहे.
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे. मात्र, काँग्रेसने त्यावर आक्षेप घेत सर्वाधिक आमदार असणआऱ्या पक्षाचा आमदार विरोधीपक्ष नेता होईल, असा दावा केला आहे. काँग्रेस नेत्यांच्या आगामी बैठकीत या मुद्यावर सखोल चर्चा होईल, असेही ते म्हणालेत.
महाविकास आघाडी अबाधित राहील. या प्रकरणी आमचे शरद पवारांशी बोलणे झाले नाही. सध्या ते कराडच्या दौऱ्यावर आहेत. आमची वज्रमुठ अधिक मजबुती होईल. सध्याच्या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षनेता ठरवता येणार नाही. ते केवळ गटनेता ठरवू शकतात. सद्यस्थितीत काँग्रेसच्या आमदारांचा आकडा जास्त आहे. त्यामुळे साहजिकच आमचाच विरोधी पक्षनेता होईल, असेही बाळासाहेब थोरात याविषयी म्हणाले.
