महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । Sharad Pawar Vs Ajit Pawar NCP Crisis : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे फडणवीस सराकरमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीचे दोन बडे नेते शरद पवार आणि अजित पवार आज आणने-सामने येणार आहेत.
दोन्ही नेत्यांकडून आज (ता.५ जुलै) मुंबईत बैठका बोलवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत कोणाकडे किती आमदार असणार हे स्पष्ट होणार आहे . त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं बॉस कोण याचा उलगडा आज होणार आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांनी आपल्या आमदार,पदाधिकाऱ्यांच्या बैठका बोलावल्या आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यामध्ये तणाव निर्माण होऊ नये याची दक्षता मुंबई पोलिस घेत आहेत. दरम्यान आज सकाळी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
दोन्ही गटांकडून व्हीप जारी
दरम्यान आजच्या बैठकीसाठी दोन्ही गटाने बैठकीसाठी व्हीप जारी केला आहे. शरद पवार गटाचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप जारी केला तर अजित पवार यांच्याकडून अनिल पाटील यांनी व्हीप जारी केला आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या पाठोपाठ विधान परिषदेचे आमदार यांच्यासाठी शशिकांत शिंदे यांनी देखील व्हीप जारी केला.