नेदरलॅण्ड्सला जॅकपॉट; स्कॉटलंडला धक्का देत वर्ल्ड कपसाठी पात्र

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । सुपर सिक्समध्ये आधी वेस्ट इंडीजला हरवून त्यांचे आव्हान संपुष्टात आणले आणि नंतर झिम्बाब्वेला धक्का देत त्यांनाही स्पर्धेबाहेर फेकणारा स्कॉटलंडचा संघ अखेरच्या सामन्यात नेदरलॅण्ड्सविरुद्ध हरला आणि वर्ल्ड कप पात्रतेचा जॅकपॉट चक्क नेदरलॅण्ड्सला लागला. नेदरलॅण्ड्सच्या बास दे लीडेने स्कॉटलंडचा अर्धा संघ टिपल्यानंतर फलंदाजीत झुंजार शतकी खेळी करत संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला आणि याचबरोबर वर्ल्ड कपचा अखेरचा आणि दहावा संघ म्हणून नेदरलॅण्ड्सने वर्ल्ड कप स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले. आता रविवारी वर्ल्ड कप पात्रतेची औपचारिकता पूर्ण करणारा अंतिम सामना श्रीलंका आणि नेदरलॅण्ड्स यांच्यात रंगेल.


वर्ल्ड कपचा दहावा संघ निश्चित करणाऱया सामन्यात स्कॉटलंडने ब्रॅण्डन मॅकमलनच्या तडाखेबंद 106 धावा आणि कर्णधार रिची बॅरिंग्टनच्या 64 धावांमुळे 50 षटकांत 9 बाद 279 अशी जबरदस्त मजल मारली होती. बास दे लीडेने 52 धावांत 5 विकेट टिपत सर्वोत्तम कामगिरी केली. नेदरलॅण्ड्सला स्कॉटलंडपेक्षा सरस धावगती करण्यासाठी 44 षटकांत 280 धावांचे विजयी लक्ष्य गाठायचे होते. हे आव्हान अवघड होते, पण गोलंदाजीत चमक दाखवणाऱया बासने स्कॉट एडवर्ड्ससह 55 धावांची आणि साकिब झुल्फिकारसोबत 113 धावांची जबरदस्त भागी रचत संघाचे वर्ल्ड कप पात्रतेचे स्वप्न साकार केले. बास विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक असताना धावबाद झाला. त्याने आपल्या 92 चेंडूंतील 123 धावांच्या झंझावातात 5 षटकार आणि 7 चौकार लगावले. शेवटच्या चार षटकांत त्यांना 45 धावांची गरज होती, तेव्हा बास आणि झुल्फिकारने स्कॉटिश गोलंदाजांना फोडून काढत 7 चेंडू आधीच विजय मिळविला. त्यामुळे त्यांनी स्कॉटलंडपेक्षा सरस धावगती राखत वर्ल्ड कप पात्रतेवर आपले शिक्कामोर्तब केले. बासने 123 धावां आणि 5 विकेट घेत विवियन रिचर्डस्च्या विक्रमाची बरोबरी साधली. वन डे इतिहासात केवळ रिचर्डस्च एका सामन्यात शतक आणि 5 विकेट घेऊ शकला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *