महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे . यादरम्यान अजित पवारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेले नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने भुजबळ यांच्या कार्यालयात फोन करून आपल्याला सुपारी मिळाल्याचा दावा फोनवरून केला आहे. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप देखील समोर आली असून घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. या संबंधीचे वृत्त साम टीव्हीने दिलं आहे.
पुण्यात दौऱ्यावर असताना रात्री साडे अकराच्या सुमारास धमकीचा फोन आला. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू आहे.
धमकी देणारा तरूण अटकेत
मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासात पुण्यातील एका तरूणाने ही धमकी दिल्याचं समोर आलं. त्या तरूणाची पोलिसांनी कसून चौकशी केली. तसंच दोषी आढळल्यानंतर त्याला पुणे पोलिसांकडून अटकही करण्यात आली आहे.
सुरक्षेत वाढ
धमकी आल्यानंतर छगन भुजबळ यांच्या पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात भुजबळ सध्या मुक्कामी आहेत. तिथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. थोड्या वेळात भुजबळ पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी निघणार आहेत.