Weather Forecast : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज; या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । कोकण विभागात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमानामध्ये वाढ जाणवू लागली असून, मुंबईत आठवड्याची सुरुवात उकाड्याने झाल्याची भावना मुंबईकरांनी सोमवारी व्यक्त केली. या आठवड्यात मुंबईत फारसा पाऊस नसल्याने उकाड्याची जाणीव सहन करायला लागेल, अशी शक्यता आहे. मात्र ही तापमानवाढ फार नसेल, असा अंदाज आहे.

भर पावसाळ्यात मुंबईकरांनी दुपारच्या सुमारास उकाड्याची जाणीव झाली. दिवसभरात उन्हाचे अस्तित्वही जाणवले. सांताक्रूझ येथे सोमवारी २ मिलीमीटर, तर कुलाबा येथे १ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. फारसा पाऊस नसल्याने कमाल तापमानात किंचित वाढ झाली. सांताक्रूझ येथे ३१.८, तर कुलाबा येथे ३१.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदले गेले. दोन्ही केंद्रांवर सरासरीपेक्षा १.१ अंशांनी तापमान चढे होते, तर रविवारपेक्षा दोन्ही केंद्रांवर कमाल तापमान ०.५ अंशांनी वाढले होते.

ठाणे जिल्ह्यातही पुढील पाच दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचीच शक्यता आहे. या तुलनेत दक्षिण कोकणाच्या तुरळक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील चार ते पाच दिवस पाऊस संमिश्र राहील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. या परिस्थितीमध्ये १३ जुलैनंतर सुधारणा होऊ शकते. तोपर्यंत चढ्या तापमानाचा ताप राज्यात अनेक ठिकाणी जाणवण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात सोमवारी सरासरीपेक्षा कमाल तापमान हे १.५ ते २ अंशांनी चढे होते. मराठवाड्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा चढा आहे. परभणी आणि उदगीर येथे सोमवारी रविवारपेक्षा अनुक्रमे २.२ आणि २.४ अंशांनी कमाल तापमान वाढले होते. विदर्भातही पावसाअभावी तापमानात ३.५ अंशांपर्यंत वाढ झाली. वर्धा येथे कमाल तापमान ३४ अंशांपर्यंत पोहोचले होते, तर चंद्रपूर येथे ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा ३ अंशांनी अधिक होते.

मुंबईत शुक्रवारपर्यंत हलक्या ते मध्यम सरींचीच शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये कमाल तापमानाचा पारा ३३ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सर्वसाधारणपणे जुलैमध्ये ३०.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान असते. मात्र पावसात खंड पडला की, तापमानाचा पारा पुन्हा चढू लागतो. मागील १० वर्षांच्या उपलब्ध माहितीनुसार सन २०१९मध्ये कमाल तापमानाचा पारा ३६.२ अंश सेल्सिअसपर्यंत चढला होता. या तुलनेत इतर वेळी जुलैमधील सर्वाधिक कमाल तापमान ३२ ते ३३ अंशांदरम्यान नोंदले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *