महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोण कोणासोबत जाईल याचा नेम नाही. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चां सातत्याने रंगत आहेत. ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी कार्यकर्त्यांकडून बॅनर्स लावून आवाहन करण्यात येत आहेत. असं असताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, “दोन ठाकरे बंधू एकत्र येऊच शकत नाहीत, ही काळ्या दागडावरची रेघ आहे. मी या गोष्टीचा साक्षीदार आहे. राज ठाकरे यांचा प्रस्ताव घेऊन मी उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो. पण आमच्या उद्धव ठाकरे यांच्या घरच्या माणसांना दोन भावांना एकत्र आणायचं नाही. राज ठाकरेच आधी पक्षाचं काम करत होते. उद्धव ठाकरे नंतर आले. ते आयत्या बिळावर नागोबा बसले. खऱ्या अर्थाने राज ठाकरे यांनी मेहनत घेतली. त्यांनी सगळ्या सभा घेतल्या.”