सर्वसामान्य महागाई ने त्रस्त ! भाज्यांचे दर कडाडले, महागाई तीन महिन्यांच्या उच्चांकावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । मागील काही महिने किरकोळ महागाईत घसरण झाल्याने मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, महागाईच्या घसरणीला आता ब्रेक लागला असून जून महिन्यात किरकोळ महागाई दरात वाढ नोंदवली गेली आहे. टोमॅटोच्या वाढत्या दराचा परिणाम दिसू लागला आहे. टोमॅटो, हिरवी मिरची, आले यासह खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे किरकोळ महागाईचा ट्रेंड अखेर संपुष्टात आला असून जूनमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ४.८१% या तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे, जो मे महिन्यात ४.३१% (सुधारित) होता.

जूनमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने महागाईचा दर वाढला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने बुधवारी १२ जुलै रोजी किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली. विशेष म्हणजे खाद्यपदार्थांच्या किरकोळ महागाईचा दर मे महिन्यात २.२९% वरून जूनमध्ये ४.४९ टक्क्यांवर पोहोचला. गेल्या महिन्यात किरकोळ महागाईचा दर प्रथमच वाढला आहे. तर गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत महागाईचा दर कमी झाला असून जून २०२२ मध्ये किरकोळ महागाई ७.०१ टक्के होती.

मे महिन्याच्या तुलनेत कपडे आणि फुटवेअर श्रेणीतील निर्देशांकात वाढ झाली आहे. हा निर्देशांक मे महिन्यात १८६.२ होता, जो जूनमध्ये वाढून १८६.९ झाला. दुसरीकडे गृहनिर्माण क्षेत्राचा निर्देशांक जूनमध्ये मेच्या तुलनेत किंचित घसरणीसह १७४.४ वर आला असून गृहनिर्माण क्षेत्राचा निर्देशांक मे महिन्यात १७५.६ वर होता.

जून महिन्यात महागाई वाढली असली तरी ती आरबीआयच्या 6 टक्क्यांच्या सहनशीलतेच्या मर्यादेपेक्षा कमी आहे. आरबीआयची महागाईची उच्च सहनशीलता मर्यादा संपूर्ण आर्थिक वर्षासाठी ६ टक्क्यांच्या खाली राहण्याची शक्यता आहे. महागाईसाठी आरबीआयची कमी सहनशीलता मर्यादा दोन टक्के आहे.

देशातील किरकोळ महागाईचा दर मे महिन्यात ४.२५ टक्क्यांवर आला होता. २५ महिन्यांतील महागाईचा हा नीचांक आहे. एप्रिल २०२१ मध्ये महागाई ४.२३ टक्के होती. महागाईतील ही घट खाद्यपदार्थांच्या किमतीत घट झाल्यामुळे झाली आहे. यापूर्वी एप्रिल २०२३ मध्ये किरकोळ महागाई दर ४.७० टक्के होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *