![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान एक जूनपासून कमी केले. त्यामुळे ई- वाहने खरेदीचा वेग मंदावला असून, मागील दोन महिन्यांत इलेक्ट्रिक वाहनाच्या विक्रीत घट झाल्याचे आहे. इलेक्ट्रिक वाहनांवरील अनुदान कमी केल्यामुळे ई-वाहन खरेदी करताना नागरिकांना २० ते २५ हजार रुपये जादा मोजावे लागत आहेत.
गेल्या काही वर्षांत पेट्रोल व डिझेलच्या इंधनात मोठी वाढ झाल्याने पर्यावरणपूरक ई-वाहनांना मागणी वाढली आहे. सरकारनेही पर्यावरणाचा समतोल टिकविण्यासाठी जादा अनुदान देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे नागरिकांचा ई-वाहने खरेदी करण्याकडे कल वाढला होता. केंद्र सरकारकडूनही फेम टू योजनेंतर्गत इलेक्ट्रिक वाहन खरेदीला अनुदान दिले जात होते.
मात्र, केंद्रीय अवजड मंत्रालयाने एक जून २०२३ पासून नोंदणी केलेले इलेक्ट्रिक वाहनांना लागू असलेले अनुदान कमी केले आहे. केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांसाठी दिले जाणाऱ्या अनुदान १५ हजार रुपये प्रति किलोवॉटवरून दहा हजार रुपये प्रति किलोवॉट करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवरील अनुदान कमी केल्यामुळे एक जूनपासून इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना नागरिकांना २० ते २५ हजार रुपये जादा मोजावे लागत आहेत.
कोणतेही वाहन लाखाच्या पुढे…
इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती सुरुवातीपासून एक लाखाच्या पुढे होत्या. आता अनुदान कमी केल्यामुळे गाडीच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांकडून इलेक्ट्रिक गाड्या खरेदीचा वेग कमी झाला आहे. चांगल्या कंपन्या व किलोमीटरची रेंज अधिक असणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती आता दीड लाखाच्या पुढे गेल्या आहेत.