गेल्या चार दिवसांत पवार काका-पुतणे यांची तीनवेळा भेट ; राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात सध्या काय सुरु आहे? याबाबत कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांच्या मनात संभ्रण निर्माण झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी पडद्यामागे सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे याबाबत वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्यावर टोकाची टीका देखील करण्यात आली आहे. पण त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडी संभ्रमात पाडणाऱ्या आहेत.

बंडानंतर ‘सिल्व्हर ओक’वर काका-पुतणे पहिल्यांदा भेटले
शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या गेल्या आठवड्यात ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत्या. तिथे त्यांच्या हातावर एक छोटीशी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर त्यांना गेल्या आठवड्यात शुक्रवारी (14 जुलै 2023) डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी अजित पवार शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी गेले.

काकूंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवार सिल्व्हर ओकवर गेले होते. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे ‘सिल्व्हर ओक’वर उपस्थित होते. अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांची आपले काका शरद पवार यांच्यासोबतची पहिली भेट होती. या भेटीत अजित पवार यांनी काकू प्रतिभा पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ही भेट कौटुंबिक होती. अंतर्मनाची साद ऐकून इथे आलो, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी त्यावेळी दिली होती.

अजित पवार गटाचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला
या भेटीनंतर लगेच दोन दिवसांनी अजित पवार, मंत्र्यांसह शरद पवार यांना भेटले. पक्ष फुटू नये आणि एकसंघ राहावा यासाठी शरद पवारांना विनंती केल्याची प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली. ही भेट रविवारी(16 जुलै) घडून आली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. यावेळी एक तास बैठक झालेली. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“आम्ही शरद पवार यांच्या आशीर्वादासाठी इथे आलो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ कसा राहू शकतो यासाठी त्यांनी योग्य विचार करावा आणि येणाऱ्या दिवसांत मार्गदर्शन करावं, अशी विनंती शरद पवार यांच्याकडे केली आहे”, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती.

अजित पवारांसह 30 आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट
विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर सोमवारी (17 जुलै) पुन्हा तशाच काही घडामोडी घडल्या. अजित पवार यांच्यासह 30 समर्थक आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली. त्याआधी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्यात 45 मिनिटे बैठक झाली. त्यानंतर शरद पवार अजित पवार गटाच्या 30 आमदारांना भेटण्यासाठी चौथ्या मजल्यावर आले.

शरद पवारांनी अजित पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली नाही. पण भाजपबरोबर न जाण्याच्या निर्णयावर पवार ठाम असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. याशिवाय शरद पवार यांनी रविवारी संध्याकाळी नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली होती. धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर राहणार, भाजपबरोबर जाणार नाही, असं पवार नाशिकच्या मेळाव्यात म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *