महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – अनलॉक नंतर गर्दी वाढल्याने पुण्याला हादरे बसत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये शहरात तब्बल 460 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातली एकूण संख्या 10 हजारांच्या वर गेली आहे. तर दिवसभरात 117 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. पुण्यात आज 12 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 481 जणांचा मृत्यू झाला आहे. 232 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 44 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 10643 वर गेली आहे.
राज्यात आजही कोरोना रुग्णांच्या संख्येत धक्कादाय वाढ झाली आहे. आजही 3307 रुग्णांची नव्याने भर पडली. त्यामुळे एकूण संख्या 1 लाख 16 हजारांवर गेली आहे. तर आज 114 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 5651वर गेली आहे. मुंबईत आज 77 जणांचा मृत्यू झाला. तर आज 1315 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
खासगी प्रयोगशाळेत (लॅब) करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने 2200 व 2800 रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र, थेट लॅबमध्ये तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून नागरिकांबाबत राज्य सरकारनं दिलासादायक निर्णय घेतला आहे. थेट लॅबमध्ये येणाऱ्या नागरिकांकडून 2800 रुपये न आकारता त्यांच्याकडून 2500 रुपये घ्यावेत, असा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. मुंबईमध्ये आठवडाभरात 650 रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले