महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीमुळे अवघ्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच त्यांनी राज्याच्या उपमुख्यंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून ते लवकरच मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा रंगली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी परवा यासंबंधीचे सूचक ट्विट केल्यामुळे या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार की नाही हे केवळ तीनच लोक सांगू शकतात, असे म्हणत जनतेची उत्सुकता वाढवली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी येथील पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार किंवा नाही याविषयी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, अजित पवार मुख्यमंत्री होणार किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर केवळ 3 जण देऊ शकतात. एक पंतप्रधान नरेंद्र मोदी. दोन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व तिसरे स्वतः अजित पवार. या तिघांशिवाय चौथा कोणताही व्यक्ती यावर उत्तर देऊ शकणार नाही. आंबेडकर यांच्या या विधानामुळे अजित पवारांच्या संभाव्य मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा खमंग चर्चा सुरू झाली आहे.
