महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भांगामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता पुढील आणखी ४ दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 5 दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्याच्या अनेक भागामध्ये मोठ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच अतिवृष्टी आणि पुरामुळं शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर आज मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज राज्यातील एकूण 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, पुणे, मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी राज्यात पावसाचा जोर आणखी काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे
तर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने जोर सुरू असल्याने पंचगंगा नदीने पहाटे तीन वाजता इशारा पातळी गाठली आहे. आता ती धोका पातळीकडे हळूहळू सरकत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.