Stuart Broad: स्टुअर्ट ब्रॉडने त्या सहा षटकारांवर सोडले मौन ; म्हणाला, “आज जो मी…”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्ती जाहीर केली आहे. अ‍ॅशेस मालिकेत तो कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळत आहे. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर ब्रॉडने अनेक संस्मरणीय क्षणांबद्दल सांगितले. त्यात युवराज सिंगच्या सहा षटकारांचाही समावेश होता. २००७ च्या टी२० विश्वचषकात युवराज सिंगने ब्रॉडला सहा षटकार ठोकले होते. यावर ब्रॉड म्हणाला की, “आज तो ज्या प्रकारचा खेळाडू घडला आहे, तो त्या सहा षटकारांमुळेच.”

ब्रॉडने सांगितले की, त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात हा एक कटू धडा होता आणि त्याने त्याला एक स्पर्धात्मक खेळाडू बनण्यास मदत केली, चांगल्या लोकांना क्रिकेटमध्ये काहीतरी करून दाखवण्याची संधी देण्यासाठी वाईट दिवस आणि खराब कामगिरीतून जावे लागते. त्यावर ते कशी मात करतात आणि पुढे जातात हे फार महत्वाचे असते.

२००७च्या टी२० विश्वचषकातील भारत-इंग्लंड सामन्यात युवराज सिंगने मारलेले सहा षटकार हे ब्रॉडच्या आठवणीत कायम राहतील, असे अनेक माजी भारतीय खेळाडूंनी यापूर्वी सांगितले आहे.युवराजच्या सहा षटकारांवर, ब्रॉड पत्रकार परिषदेत म्हणाला, “हो, तो साहजिकच खूप कठीण दिवस होता. मी त्यावेळी २१-२२ वर्षांचा होतो. मला त्यातून खूप काही शिकायला मिळाले. मी त्या अनुभवातून आपली मानसिकता कशी खंबीर ठेवायची हे शिकलो. ज्यावेळी हे सर्व घडलं त्यावेळी मी खूप तणावात होतो. यातून बाहेर पडायला मला खूप दिवस लागले. मात्र, यातून मानसिकरित्या मजबूत झालो आणि जे काही आज आहे ते या घटनेमुळेच. हे जाणून घेण्यासाठी माझ्याकडे एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून फारच कमी वेळ शिल्लक होता. मी पुन्हा जोमाने तयारी सुरू केली, माझ्याकडे प्री-बॉल रुटीन नव्हते. माझे कोणतेही विशेष लक्ष नव्हते पण मी रोज माझ्या गोलंदाजीवर काम करू लागलो आणि आज हे विक्रम मी रचले याचा मला अभिमान आहे.”

दिग्गज गोलंदाज ब्रॉड पुढे म्हणाला, “त्या दिवसाच्या शेवटी, मला वाटले की असे झाले नसते तर फार बरे झाले असते. मात्र, मला वास्तवात जर खरी सुधारणा माझ्या गोलंदाजीत झाली असेल ती याच टी२० विश्वचषकामुळेच कारण, जे काही आज घडलो आहे ते या प्रसंगामुळे झाले. या घटनेनंतर संघातून मला काढून टाकण्यात आले होते. मात्र, असे वाटते की यामुळे मला स्पर्धात्मक बनण्यास बळ मिळाले आहे. आयुष्यात खूप धक्के पचवण्याची शक्ती याचमुळे मिळाली.”

बेन स्टोक्सचे एक प्रमुख उदाहरण म्हणून वर्णन करताना ब्रॉड म्हणाला की, “प्रत्येक खेळाडू त्याच्या कारकिर्दीत चढ-उतारांमधून जात असतो. मात्र, त्याने पुनरागमन करताना लवचिक राहण्याच्या आणि खराब कामगिरीचा भविष्यातील सामन्यांवर परिणाम होऊ न देण्याच्या महत्त्वाच्या गोष्टींवर भर दिला.” १५ ते १६ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत, ब्रॉडने सांगितले की, “वाईट दिवसांना सामोरे जाणे महत्त्वाचे आहे कारण ते बर्‍याचदा चांगल्या दिवसांपेक्षा जास्त असतात. अडथळे हाताळण्याची ही क्षमता एखाद्याची प्रतिभा मैदानावर सिद्ध करते आणि याची खात्री करण्यासाठी जीवनात चढ-उतार येणे आवश्यक आहे.”

ब्रॉड पुढे म्हणाला की, “तुम्ही साहजिकच चढ-उतारांमधून जात आहात आणि जेव्हा स्टोक्ससारख्या व्यक्तीच्या कारकिर्दीकडे पाहता, तेव्हा त्यानेही असेच केले आहे. बहुतेक खेळाडूंच्या बाबतीत असेच झाले होते किंवा होत आहे. परंतु शेवटी मला वाटते की, त्यातून ते परत कसे येतात? हे फार महत्वाचे आहे. हीच क्षमता आहे जी दिग्गज खेळाडू आणि सामन्य खेळाडूमध्ये फरक करू शकते. तुमचे वाईट दिवस तुम्हाला मागे टाकता आले पाहिजेत. कारण १५-१६ वर्षांच्या कारकिर्दीत क्रिकेटमधील चांगल्या दिवसांपेक्षा वाईट दिवस नक्कीच खूप जास्त असतात. त्यामुळे तुम्हाला हे सुनिश्चित करावे लागेल की, वाईट दिवसांना सामोरे जाण्यास आम्ही सक्षम असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमचे चांगले दिवस तुम्हाला अधिक आनंद देऊन जातील.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *