महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑगस्ट । मेटाने एक मोठा निर्णय घेतला आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून आता बातम्या शेअर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोबतच, न्यूज पोर्टलच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेल्या बातम्यांच्या लिंक्स हटवण्यास मेटाने सुरूवात केली आहे. कॅनडामध्ये ही कारवाई करण्यात येत आहे.
कॅनडा सरकारने ऑनलाईन न्यूज कायदा पारित केल्यानंतर मेटाने हे पाऊल उचललं आहे. या कायद्यावर मेटा आणि गुगल या दोन मोठ्या कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या तरी केवळ कॅनडा देशामध्येच ही कारवाई करण्यात येत आहे.
काय आहे कायदा?
कॅनडाच्या संसदेने Online News Act हा कायदा पारित केला आहे. या कायद्यानुसार गुगल, फेसबुक अशा प्लॅटफॉर्मवर जर बातम्यांच्या लिंक्स शेअर करायच्या असतील, तर त्यांना कॅनडामधील न्यूज पब्लिशर्सना त्या बदल्यात पैसे द्यावे लागतील. यासाठी गुगलची पॅरंट कंपनी असलेल्या अल्फाबेट आणि फेसबुकची पॅरंट कंपनी असलेल्या मेटाला कॅनडातील वृत्तसंस्थांशी करार करावा लागेल.
मेटाची नाराजी
मेटा कंपनीच्या कॅनडामधील पब्लिक पॉलिसी प्रमुख असणाऱ्या रेचल करन यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं. “न्यूज आउटलेट स्वेच्छेने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर आपला कन्टेन्ट शेअर करतात. आपला वाचकांपर्यंत रीच वाढवण्यासाठी ते या प्लॅटफॉर्मचा आधार घेतात. आमच्या प्लॅटफॉर्मवर लोक सामान्य वापरासाठी येतात, बातम्या वाचण्यासाठी ते येत नाहीत”, असं त्या म्हणाल्या. (Meta Blocking News in Canada)
कॅनडाने का घेतला निर्णय?
कॅनडा सरकारने स्थानिक वृत्तसंस्थांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशात जाहिरातींमधून होणाऱ्या कमाईत घट झाली आहे. नवीन कायदा लागू झाल्यामुळे स्थानिक माध्यमांना चालना मिळेल, आणि याचा हजारो लोकांना दिलासा मिळेल असा सरकारचा विश्वास आहे.
फेसबुकवरून बातम्या होणार गायब?
गेल्या काही वर्षांमध्ये फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटर अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बातम्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सोशल मीडिया पहिल्यासारखा राहिला नसल्याचं कित्येक यूजर्स म्हणत आहेत. यामुळेच मेटानेही काही महिन्यांपूर्वी फेसबुकवरील ‘इन्स्टंट आर्टिकल’ हे फीचर बंद केलं आहे.
सोबतच, मेटा बातम्यांच्या लिंक्सचा रीचही कमी करत आहे. त्यामुळे भविष्यात कदाचित फेसबुकवरुन बातम्या पूर्णपणे ब्लॉक केल्या जाऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.