पिंपरी-चिंचवडकरांचे निगडीपर्यंत मेट्रोचे स्वप्न पूर्ण होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑगस्ट । पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रोचा राज्य सरकारचा प्रस्ताव आपल्याकडे आला आहे. त्या प्रस्तावाला येत्या सात दिवसांच्या आत मान्यता देण्याचे आश्वासन केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिले असल्याचे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. त्यामुळे निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचे पिंपरी-चिंचवडकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी हा मेट्रो मार्ग होता. आता पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय हा १३.९ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे. निगडीपर्यंत मेट्रो सुरू करण्याची शहरवासीयांची मागणी आहे. राज्य शासनाने निगडीपर्यंतच्या मेट्रोचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. त्या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी खासदार बारणे यांनी गुरुवारी मंत्री पुरी यांची भेट घेतली. निगडीपर्यंतच्या मेट्रोला मान्यता देण्याची विनंती केली.

पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या दोन दशकांत झपाट्याने नागरीकरण झाले आहे. २०११ मध्ये १७ लाख असलेल्या शहराची लोकसंख्या २०१७ मध्ये २१ लाखापर्यंत पोहोचली. सद्यस्थितीत २५ लाख आहे. २०८ पर्यंत ३० लाख आणि २०३८ पर्यंत ३९ लाखांपर्यंत लोकसंख्या पोहोचण्याचा अंदाज आहे. आकुर्डी, चिंचवड आणि निगडी परिसरातील नागरिकांची निगडीपर्यंत मेट्रो सुरु करण्याची मागणी आहे. याबाबत २५ फेब्रुवारी २०२२ रोजी गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाला ९१० कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चासह सुधारित प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्यात आला आहे.

निगडीपर्यंतच्या विस्तारित मार्गासाठी होणाऱ्या खर्चात केंद्र सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समप्रमाणात वाटा असेल. हा प्रस्तावित मार्ग चार किलोमीटर लांबीचा आहे. याला तत्काळ मान्यता दिल्यास निगडीपर्यंतचे काम वेळेत पूर्ण होईल. येत्या सात दिवसांत या प्रस्तावाला मान्यता देण्याचे आश्वासन मंत्री पुरी यांनी दिले. त्यामुळे निगडीपर्यंतचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे खासदार बारणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *