टोमॅटोच नव्हे तर ‘या’ खाण्या-पिण्याच्या वस्तूही महागल्या, संसदेत सरकारकडून आकडेवारी सादर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । खाद्यपदार्थांच्या गगनाला भिडलेल्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पावसाळ्यात फक्त टोमॅटोचे दर वाढले नाहीत, तर इतर खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या आठवड्यात खाद्यपदार्थांची सरकारी आकडेवारीही सादर केली आहे. ही सरकारी आकडेवारी दाखवते की, बटाट्याशिवाय इतर खास खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या आठवड्यात संसदेत सांगितले की, गेल्या एका वर्षात तूर डाळीच्या किमती कमाल २८ टक्के वाढल्या आहेत. यानंतर तांदूळ १०.५ टक्के, उडीद डाळ आणि मैदाच्या किमतीत प्रत्येकी ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गुरुवारी तांदळाची सरासरी किरकोळ किंमत ४१ रुपये प्रति किलो होती, जी एका वर्षापूर्वी ३७ रुपये होती.

तूर डाळीच्या किमतीत वाढ होण्याचे कारण देशांतर्गत उत्पादनातील कमतरता असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. यामध्ये म्हटले आहे की २०२२-२३ पीक वर्षासाठी कृषी मंत्रालयाच्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, मागील पीक वर्षातील ४२.२ लाख टनांच्या तुलनेत तूर डाळीचे उत्पादन ३४.३ लाख टन इतके होईल, असा अंदाज आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या किंमत मॉनिटरिंग सेलनुसार, गुरुवारी तूर डाळीची सरासरी किरकोळ किंमत १३६ रुपये प्रति किलो होती, जी गेल्या वर्षी १०६.५ रुपये प्रति किलो होती. उडीद डाळीचा भाव गेल्या वर्षीच्या १०६.५ रुपयांवरून ११४ रुपये किलो झाला आहे. मूग डाळीचा भावही आता १०२ रुपये प्रतिकिलो झाला आहे, जो गेल्या वर्षी १११ रुपये होता. मंत्रालयाने सांगितले की, भाज्यांमध्ये, बटाट्याची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १२ टक्के कमी आहे, तर कांद्याची किंमत एक वर्षापूर्वीच्या तुलनेत सुमारे ५ टक्क्यांनी जास्त आहे.

याचबरोबर, टोमॅटोच्या किमतींबाबत मंत्रालयाने म्हटले आहे की, पिकाची हंगामी स्थिती, कोलारमधील पांढऱ्या माशीचा रोग आणि देशाच्या उत्तर भागात मान्सूनचे तत्काळ आगमन या कारणांमुळे अलिकडच्या आठवड्यात टोमॅटोच्या किमतीत वाढ झाली आहे. हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात टोमॅटो पिकांना फटका बसला असून मुसळधार पावसामुळे विविध भागात पुरवठा विस्कळीत झाला आहे.गुरुवारी टोमॅटोचा सरासरी भाव १४० रुपये प्रतिकिलो होता, जो गेल्या वर्षी ३४ रुपये होता, असे सरकारी आकडे सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *