ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी प्रेक्षकांना प्रवेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – : दि.२१ – जर १५ संघांना ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात येण्याची परवानगी देण्यात आली, तर प्रेक्षकांनासुद्धा स्टेडियममध्ये नक्कीच प्रवेश देण्यात येईल, असे आश्वासन क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉक्ले यांनी शनिवारी दिले.

करोनामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले असून काही दिवसांपूर्वीच केव्हिन रॉबर्ट्स यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचाही राजीनामा दिला. त्यांच्याऐवजी हंगामी स्वरूपासाठी या पदावर नियुक्ती करण्यात आलेल्या हॉक्ले यांनी विश्वचषकाचे आयोजन झाल्यास चाहत्यांना नक्कीच प्रवेश देण्यात येईल, असे मत व्यक्त केले.

‘‘जर ‘आयसीसी’ने विश्वचषकाच्या आयोजनास परवानगी दिली, तर १५ संघांतील खेळाडूंसह व्यवस्थापक आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेची काळजी घेणे, हे आमच्यापुढील मुख्य आव्हान असेल. मात्र जर १५ संघांतील खेळाडू ऑस्ट्रेलियात आले, तर प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यापासून आम्ही रोखू शकत नाही,’’ असे हॉक्ले म्हणाले. हॉक्ले सध्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची भूमिकाही बजावत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) विश्वचषकाबाबतचा निर्णय पुढील महिन्यापर्यंत लांबणीवर टाकला आहे.

‘‘प्रेक्षकांशिवाय क्रिकेट सामने खेळवण्याची कल्पना खरंच विचित्र आहे. त्यातही विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा चाहत्यांविना खेळवल्यास स्पर्धेचा दर्जा खालावण्याचीही भीती आहे. त्यामुळे ‘आयसीसी’ने विश्वचषकाच्या आयोजनाला परवानगी दिल्यास आम्ही अधिक जोमाने तयारीला लागू. किमान स्टेडियमच्या प्रेक्षकक्षमतेपैकी ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश मिळावा, यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया नक्कीच प्रयत्न करेल,’’ असेही हॉक्ले यांनी सांगितले. १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धेबाबतच्या अंतिम निर्णयावरच इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) भवितव्य अवलंबून आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड करण्यात येईल, याची पुसटशीही कल्पना नसल्याचे हॉक्ले यांनी सांगितले. ‘‘ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट या खेळाचा फार आदर केला जातो. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर अचानक नियुक्ती करण्यात आल्याने मी आश्चर्यचकित झालो. माझ्यावरील जबाबदाऱ्या आता वाढल्या असून कमीत कमी कालावधीत छाप पाडण्यासाठी मी उत्सुक आहे,’’ असे हॉक्ले यांनी सांगितले.

विश्वचषकाचे आयोजन नियोजित वेळापत्रकाप्रमाणे झाल्यास सर्व संघांतील खेळाडूंनी किमान महिनाभरापूर्वीच ऑस्ट्रेलियात दाखल व्हावे, अशी मागणी हॉक्ले यांनी केली आहे. ‘‘करोनानंतरच्या काळातील क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या आरोग्य सुरक्षेला नेहमीच प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी खेळाडूंची आरोग्य तपासणी करण्यात येईल. त्याचप्रमाणे त्यांना १५ दिवसांसाठी विलगीकरणसुद्धा करावे लागेल. या सर्व प्रक्रियेसाठी सर्व संघांतील खेळाडू किमान महिनाभरापूर्वी ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यास आमच्यावरील भार कमी होईल,’’ असे हॉक्ले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *