महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । टोमॅटोनंतर आता कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या टोमॅटोच्या दरातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे. मात्र, आता कांद्याचे दर सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे. कांद्याच्या भावात चांगलीच तेजी असल्याचं बाजारात दिसतंय. नाशिक जिल्ह्यातील कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथील कृषी बाजार समितीत कांद्याच्या झालेल्या लिलावात कांद्याच्या सरासरी बाजार भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक घटल्याने ५०० रुपयांची मोठी वाढ झाल्याचे दिसून आली आहे.
१३०० वाहनातून बारा हजार क्विंटल कांद्याची आवक आली होती. त्याला जास्तीत जास्त २३०१ रुपये, कमीत कमी १००० रुपये तर सरासरी २१०० रुपये इतका क्विंटलला बाजार भाव मिळाले आहे. बदलत्या वातावरणामुळे चाळीमध्ये साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडत असल्याने सप्टेंबर महिन्यात कांद्याचे दर दुप्पट होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. लासलगाव मार्केटमध्ये दिवसाला सुमारे २० ते २५ हजार क्विंटल कांदा येतो. मात्र, गेल्या काही दिवसांत हे प्रमाण १५ हजार हजार क्विंटलपर्यंत आले आहे. कांद्याची आवक घटल्याने आणि कांद्याची मागणी वाढल्याने कांद्याचा तुटवडा जाणवत असल्याने परिणामी कांद्याच्या किरकोळ बाजारातही वाढ झाली आहे.
आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात पावसामुळे कांद्याचे पीक घेण्यात महिनाभराचा उशीर झाला आहे. तर, नगर जिल्ह्यातून येत असलेल्या कांद्याची आवकही बाजारात कमी झाली आहे. त्यामुळेही कांद्याचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी कांद्याला अगदीत कमी भाव मिळत होता. कांदा ७ ते ८ रुपये किलोने बाजारात खरेदी करण्यात येत होता. मात्र, आता घाऊक बाजारात कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळत आहे.
सध्या कांद्याचे वाढलेले हे भाव गेल्या आठ महिन्यांत कांद्याला मिळालेला हा उच्चांकी दर मानले जात आहेत. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये कांद्याला २३११ असा दर मिळाला होता. सध्या नाशिक जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये कांद्याच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे. एका आठवड्यात जवळपास सरासरी घाऊक दरात ४८ टक्के वाढ झाली आहे.