राज ठाकरेंचं शरद पवार-अजित पवार भेटीवर सूचक विधान; म्हणाले, “मी….. …”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑगस्ट । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व गेल्याच महिन्यात पक्षात फूट पडल्यानंतर सरकारमध्ये सामील झालेले अजित पवार यांच्या भेटीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात व महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झाल्याची प्रतिक्रिया ठाकरे गट व काँग्रेसकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, दुसरीकडे खुद्द शरद पवारांकडून असं काहीही नसल्याची भूमिका मांडली जात आहे. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

“सरकार काय, सगळीकडेच संभ्रम”
राज ठाकरेंनी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली. त्यानंतर सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये संभ्रम असल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता राज ठाकरेंनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाच उलटा प्रश्न केला. “सरकार काय, पत्रकारितेतही कन्फ्युजनच आहे. कोण कुणाचा आहे हेच कळत नाही हल्ली. उलटा फिरला की लेबल कळतं मागे लागलेलं. कोणत्या पक्षाचा आहे ते. त्यामुळे सगळीकडेच कन्फ्युजन आहे. बघू.. दूर होईल लवकरात लवकर”, असं राज ठाकरे म्हणाले.

शरद पवार व अजित पवार भेट
दरम्यान, शरद पवार व अजित पवारांच्या गुप्त भेटीबाबत राज ठाकरेंना विचारणा करण्यात आली असता त्यांनी खोचक विधान केलं. “माझं ऐकत नाही तुम्ही. मी सांगितलं होतं ना तेव्हा? हे त्यांचंच स्वत:चं आहे. त्यांनी एक टीम आधी पाठवली. आता दुसरी जाईल. हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“हे आज नाही, २०१४ पासून मिळाले आहेत. पहाटेचा शपथविधी तुम्हाला आठवत नाही का? शरद पवार आणि अजित पवार यांना भेटायची जागा चोरडिया या नावाच्या व्यक्तीकडे मिळाली हीदेखील कमाल आहे”, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

अजित पवारांच्या बंडखोरीवर काय होतं राज ठाकरेंचं ट्वीट?
२ जुलै रोजी अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज ठाकरेंनी सूचक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये राज ठाकरेंनी सरकारमध्ये सामील झालेली राष्ट्रवादीची पहिली टीम असून दुसरी टीम यथावकाश सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच, असं नमूद केलं होतं.

“उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार?”, असं राज ठाकरेंनी या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *