महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । Asia Cup 2023 : आशिया कप 2023 चा थरार येत्या 30 ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेत रंगणार आहे. पण अद्याप अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली नाही. यासोबत केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या दुखापतीच्या अपडेटची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद आणि संदीप पाटील यांनी आशिया कपसाठी संघाची निवड केली आहे. भारताच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी यामध्ये राहुल ते अय्यरला स्थान दिलेले नाही. एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अशा स्थितीत आयसीसी स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने आशिया कप खुप महत्त्वाचा आहे.
आशिया कपपूर्वी स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमादरम्यान, रवी शास्त्री, एमएसके प्रसाद आणि संदीप पाटील यांनी आशिया कपसाठी निवडल्या जाणाऱ्या संभाव्य 15 खेळाडूंची नावे दिली आहेत. ज्यात तिलक वर्मा ते सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे.
रवी शास्त्री म्हणाले की, तिलक वर्माने वेस्ट इंडिज मालिकेतील कामगिरीने प्रभावित केले आहे. अशा स्थितीत तो आशिया कपसाठी संघात स्थान मिळवण्याचा दावेदार आहे. खेळाडूंच्या सध्याच्या कामगिरीला प्राधान्य द्यायला हवे.
तज्ज्ञांनी आशिया कपसाठी सूर्यकुमार यादवलाही संघात स्थान दिले आहे. मात्र, सूर्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडेत विशेष कामगिरी करता आली नाही. पण टी-20 मालिकेत सूर्यकुमारने 2 अर्धशतके झळकावून शानदार पुनरागमन केले.
दूसरीकडे, लेगस्पिनर युजवेंद्र चहलला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने चमकदार कामगिरी केली. त्यामुळे चहलला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळत नाहीये.