लवकरच ६ जी सेवा येणार? जाणून घ्या…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट ।

६ जी म्हणजे काय?
६ जी हे सिक्स्थ जनरेशन सेल्यूलार तंत्रज्ञान असून या तंत्रज्ञानाच्या मदतीने मायक्रो सेकंदाच्या वेगाने कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. ४ जी, ५ जी तंत्रज्ञानाच्या पुढील तंत्रज्ञान म्हणजेच ६ जी तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानात हायर फ्रिक्वेन्सी बँड्सची मदत घेण्यात येते. ६ जी एक क्लाऊड बेस नेटवर्किंग टेक्नॉलॉजी असून या तंत्रज्ञानाच्या मदतीने इंटरनेटचा वेग कित्येक पटीने वाढणार आहे.

६ जी नेटवर्कमुळे नेमके काय बदलणार?
सध्या ६ जी नेटवर्क अस्तित्वात नाही. मात्र, हे तंत्रज्ञान अस्तित्वात आल्यास अनेक गोष्टी चुटकीसरशी होणार आहेत. या तंत्रज्ञानाची मदत घेणारी व्यक्ती कमी वेळेत डेटाची देवाणघेवाण करू शकते. कोणतीही बफरिंग न होता किंवा डिसकनेक्टिव्हिटी न होऊ देता ६ जी नेटवर्कच्या माध्यमातून डेटा ट्रान्सफर शक्य होणार आहे. जेव्हा जगात २ जी तंत्रज्ञान आले होते, तेव्हा मेसेजिंगची सुविधा उपलब्ध झाली होती. जेव्हा ४ जी तंत्रज्ञान आले होते, तेव्हा मोबाईलमध्ये अॅप्स आले. अशाच प्रकारे जेव्हा ६ जी सुविधा येईल तेव्हा एका मशीनचा थेट दुसऱ्या मशीनशी कोणत्याही अडथळ्यांविना संवाद असेल. हे एक स्मार्ट इंटरनेटचे जग असेल. ६ जी अस्तित्वात आल्यास आभासी आणि प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या जगाचे अंतर आणखी कमी होईल, असे म्हटले जाते.

५ जी आणि ६ जी मध्ये नेमका फरक काय?
सध्याच्या ५ जी तंत्रज्ञानावर आधारितच ६ जी तंत्रज्ञान येणार आहे. मात्र, ६ जी हे ५ जी नेटवर्कच्या तुलनेत अनेक अंगांनी सरस असणार आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते ६ जी नेटवर्कच्या मदतीने एका मायक्रोसेकंदाला साधारण १ टेराबाईट (एक हजार गिगाबाईट) डेटा ट्रान्सफर करता येईल. सध्या ५ जी नेटवर्कच्या मदतीने एका मिलीसेकंदात (एक हजार मायक्रो सेकंद) साधारण २० गिगाबाईट डेटा ट्रान्सफर होतो. ६ जी नेटवर्कच्या मदतीने थेट मशीन टू मशीन यांच्यात संवाद असेल. सामान्य भाषेत सांगायचे झाल्यास हा संवाद एवढा जलद असेल की, सामान्य माणसाला काही समजायच्या आत डेटा ट्रान्सफरची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल.

६ जी तंत्रज्ञानामुळे काय बदल होणार?
६ जी तंत्रज्ञानामुळे काय बदलणार याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आपल्या भाषणात दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ६ जीमुळे खूप लांबून कंपन्यांमधील काम सुरू ठेवता येईल. गॅझेट्सच्या मदतीने कार चालवता येईल. तसेच ६ जी नेटवर्कची मदत घेऊन गॅझेट्सना मानवी संवेदना समजेल.

६ जी सेवा कधी येऊ शकते?
सध्यातरी ६ जी सेवा कधी येणार हे स्पष्ट नाहीये. जगभरात कोठेही ६ जी सेवा अस्तित्वात नाही. मात्र, तरीदेखील २०३० सालापर्यंत ही सेवा येऊ शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना वाटते. इंटेलमधील नेटवर्क आणि एज ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष निक मॅककिन यांच्या अंदाजानुसार साधारण २०३० सालापर्यंत ६ जी सेवा कार्यान्वित होऊ शकते. मार्केट रिसर्च फर्म स्ट्रॅटेजी अॅनालिटिक्सचे कार्यकारी संचालक नील मॉस्टन यांच्या मते ६ जी सेवा २०२९ सालात येऊ शकते. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही मॉस्टन म्हणाले.

६ जी सेवेसाठी भारताची काय तयारी?
काही ठिकाणी ६ जी तंत्रज्ञानावर काम सुरू झालेले आहे. दक्षिण कोरियाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये टेराहर्ट्झ फ्रिक्वेन्सी बँड्स विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच जपानमधील ओसाका विद्यापीठातही यावर संशोधन सुरू आहे. भारतानेही ६ जी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारत ६ जी व्हिजीन’ डॉक्युमेंट लॉन्च केले आहे. यासह भारताच्या टेलिकॉम विभागाने एका टास्क फोर्सची निर्मिती केली असून या टास्क फोर्सला ‘भारत ६ जी अलायन्स’ असे नाव देण्यात आले आहे. तसेच भारतात ६ जी सेवा कशी राबवायची याबाबतची तयारी सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशात ६ जी सेवा दोन टप्प्यांत सर्वत्र कार्यान्वित केली जाईल. पहिल्या टप्प्यात २०२३-२०२५ या काळात ही सेवा राबवण्यासाठीच्या संकल्पनांवर गांभीर्याने विचार केला जाणार आहे. अशा संकल्पना मांडणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. दुसरा टप्पा हा २०२५ ते २०३० अशा एकूण पाच वर्षांचा असेल. या टप्प्यात सर्व संकल्पना प्रत्यक्षात राबवून पाहिल्या जातील. तसेच ६ जी सेवेच्या व्यावसायीकरणावरही या टप्प्यात विचार केला जणार आहे.

सध्या ५ जी सेवेची काय स्थिती आहे?
जुलै २०२२ मध्ये भारतात ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात आला होता. या स्पेक्ट्रमसाठी रिलायन्स जिओ या कंपनीने सर्वाधिक ८८ हजार ७८ कोटी रुपयांची बोली लावली होती. त्याखालोखाल एअरटेलने ४३ हजार ८४ कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यानंतर लगेच ऑक्टोबर महिन्यात ५ जी सेवा कार्यान्वित करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर या सेवेचे लोकार्पण करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार सध्या ५ जी सेवेची उपलब्धता २९.९ टक्के आहे. एका रिपोर्टनुसार जुलै महिन्यात ५ जी नेटवर्कच्या माध्यमातून डाऊनलोडिंगची गती ४ जीच्या तुलनेत १९.२ पटीने अधिक होती. जुलै महिन्यात डाऊनलोडिंगची सरासरी गती ३०१.६ एमबीपीएस होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *