महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । राज ठाकरे यांनी बुधवारी (दि. १६ ऑगस्ट) पनवेल या ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती. एका कार्यक्रमात राज ठाकेरेंनी मुंबई-गोवा महामार्गावर खर्च करण्यात आलेली रक्कम लोकांना सांगितली होती. या महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे किती लोकांचा मृत्यू झाला याबाबतही त्यांनी माहिती दिली.
अशातचं, ज्या कंपनीने मुंबई-गोवा महामार्गाचे काम केले होते, त्या कंपनीच्या कार्यालयाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. कार्यकर्ते यावेळी आक्रमक होते. कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावाने घोषणाही दिल्या.
राज ठाकरेंनी बुधवारी पनवेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी ‘निर्धार’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. भारताचं यान चंद्रावर जातंय, पण रस्ते चांगले मिळत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्रातील रस्त्यांच्या झालेल्या दुराव्यस्थेवर त्यांनी भाष्य केलं.
राज ठाकरेंनी यापूर्वीही टोलनाक्यांच्या अनागोंदी कारभाराबद्दल आंदोलन उभारले होते. महाराष्ट्रातील ६० पेक्षा अधिक टोलनाके त्यांनी बंद पाडले. हे टोलनाके सामान्य जनतेची लूट करत असल्याने, ते बंद पाडणंच योग्य असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती.