“महागाई, बेरोजगारीपेक्षा मी कोणत्या गटात जाणार याला महत्त्व”, जयंत पाटलांचं विधान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याने पक्षातील अनेक निष्ठावान आणि जुन्या नेत्यांनी अजित पवारांची साथ केली आहे. तर, शरद पवारांकडे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच सहकारी थांबले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सातत्याने होत असतात. यावरून जयंत पाटलांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जयंत पाटलांचा सुनिल तटकरेंसोबतचा एक फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर, जयंत पाटील अजित पवार गटात जाणार असल्याचीही चर्चा रंगली होती. त्याच काळात जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर जयंत पाटीलही शरद पवारांची साथ सोडणार असल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु, मी शरद पवारांसोबतच कायम राहणार असून शेवटपर्यंत राष्ट्रवादीची साथ सोडणार नाही, अशी ठाम भूमिका जयंत पाटलांनी घेतली. आजही ते बीड येथे शरद पवारांसोबत दौऱ्यानिमित्त आले असताना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला.

त्यावर जयंत पाटील म्हणाले की, “रोज सकाळी उठून बोलणं मला योग्य वाटत नाही. मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. देशातील बेरोजगारी, महागाई, मणिपूरचा हिंसाचार या दुर्दैवी घटना घडत आहेत, पण याला महत्त्व नाही. परंतु, जयंत पाटील कुठे जाणार, याला महत्त्व आहे. हे सगळे महत्त्वाचे प्रश्न बाजूला सारण्याचा प्रयत्न कोणी करतंय याचा शोध घ्यावा. मी आहे तिथेचआहे.”

शरद पवार सर्वांनाच भेटतात
“शरद पवार अनुभवसंपन्न आहेत. सर्वांना भेटणं हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. कोणी भेटून गेला म्हणून पवारसाहेब त्यांच्या मागे जात नाही. महाराष्ट्रातील सर्वांना त्याचा अनुभव आहे”, असंही जयंत पाटील म्हणाले.

“साहेबांचा आशीर्वाद कोणी मागत असेल त्याच्या आड येण्याची गरज वाटत नाही. साहेबांचा आशीर्वाद मागण्याची गरज आहे, यातच आपण ओळखलं पाहिजे”, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *