महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । भारत आणि आयर्लंड यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज होणार आहे. डब्लिनमधील द व्हिलेज स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7:00 वाजता होईल.
भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत दोनदा टी-20 मालिका खेळली गेली असून दोन्ही वेळा टीम इंडियाने विजय मिळवला आहे. या बातमीत दोन्ही संघांची कामगिरी, खेळपट्टीचा अहवाल, हवामान स्थिती आणि संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दल जाणून घ्या.
सूर्यकुमार यादव या वर्षी भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
2023 मध्ये, सूर्यकुमार यादव टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. सूर्याने 11 सामन्यात 1 शतक आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने 433 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर शुभमन गिलचा नंबर लागतो. त्याने 304 धावा केल्या आहेत. गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंग 15 विकेटसह पहिल्या स्थानावर आणि दुसऱ्या क्रमांकावर हार्दिक पंड्या आहे.
आयर्लंडची जबाबदारी स्टर्लिंग आणि अडायरवर
अँड्र्यू बालबर्नीनंतर आयर्लंडने पॉल स्टर्लिंगकडे टी-20 संघाची कमान सोपवली आहे. 2023 मध्ये, आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगने T20 मध्ये चमकदार कामगिरी केली. त्याने 8 सामन्यात 216 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत मार्क अडायरने यावर्षी सर्वाधिक २१ बळी घेतले आहेत.
भारत आघाडीवर
दोन्ही संघांचे एकूण T20 क्रिकेट रेकॉर्ड पाहिल्यास भारताने वर्चस्व राखले आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण 5 टी-20 सामने खेळले गेले. टीम इंडिया प्रत्येक वेळी जिंकली.
भारत आणि आयर्लंड यांच्यातील शेवटचा T20 सामना 28 जून 2022 रोजी डब्लिनमध्येच खेळला गेला होता. भारताने तो 4 धावांनी जिंकला. दोन्ही संघांमधील सर्व सामने आयर्लंडमध्येच खेळले गेले आहेत.
हवामान अहवाल
शुक्रवारी डब्लिनमध्ये पावसाची 92% शक्यता तसेच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तापमान 16 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते.
खेळपट्टीचा अहवाल
द व्हिलेज डब्लिन स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना चांगली साथ देते. पण, या मैदानावर फिरकी गोलंदाजांचीही मदत घेता येते. जसजसा खेळ पुढे सरकतो तसतशी फलंदाजांना धावा काढणे सोपे जाते. या मैदानावर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत चार सामने खेळले गेले आहेत, प्रत्येक वेळी टीम इंडिया जिंकली आहे.
एकूण १७ टी-२० सामने येथे खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 7 सामने जिंकले, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 8 सामने जिंकले. या मैदानावरील 2 टी-20 सामने पावसामुळे रद्दही करण्यात आले आहेत.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत: जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा.
आयर्लंड: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, मार्क एडेअर, कर्टिस कॅम्पर, गॅराथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, जोश लिटल, बॅरी मॅकार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, क्रेग यंग.