गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी ५५० विशेष बसगाडय़ा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी यंदाच्या वर्षीही राज्य परिवहन महामंडळातर्फे विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. यंदाच्या वर्षी महामंडळाने ५५० इतक्या विशेष गाडय़ांचे नियोजन केले असून नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत सुमारे ३०० गाडय़ांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात महत्त्वाचा सण समजला जातो. त्यामुळे वसई, विरारमधून दरवर्षी मोठय़ा संख्येने कोकणवासीय हे गणेशोत्सव काळात आपल्या मूळ गावी जातात. कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी एसटी महामंडळाकडून विशेष सेवा पुरविली जाते. गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी पालघर एसटी महामंडळातर्फे वसई, अर्नाळा, नालासोपारा या आगारातून विशेष गाडय़ांचे नियोजन करून नोंदणी सुरू झाली आहे.

५५० विशेष गाडय़ा सोडण्यात येणार असून त्यापैकी आताच ३०० गाडय़ांची नोंदणी पूर्ण झाली असल्याचे पालघर विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी सांगितले आहे. मागील वर्षांपासून एसटीच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सुरुवातीला केवळ अडीचशे ते तीनशे गाडय़ा सोडल्या जात होत्या. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पाचशेहून अधिक गाडय़ांचे नियोजन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *