आदित्य ठाकरे आणि दादा भुसे यांची नाशिक मध्ये गुप्त भेट?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ ऑगस्ट । दादा भुसे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे कृषीमंत्री होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ते शिंदे यांच्यासोबत गेले. शिंदे सरकार आल्यानंतर ते पुन्हा मंत्री बनले. त्यांना बंदरे आणि खाणकाम विभागाचं मंत्रिपद मिळालं होतं.

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते असेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा गट सरकारमध्ये सामील झाला. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी मंत्र्यांच्या खात्यांमध्ये आदलाबदल करण्यात आली. यावेळी दादा भुसे यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाचं मंत्रिपद देण्यात आलं. त्यानंतर आता नाशिकमधून वेगळीच बातमी समोर येताना दिसत आहे.

आदित्य ठाकरे आणि दादा भुसे यांच्यात गुप्त भेटीची चर्चा
दादा भुसे आणि आदित्य ठाकरे यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील एका खाजगी रिसॉर्टमध्ये ही भेट झालीय. आदित्य ठाकरे आणि दादा भुसे यांची भेट झालेलं रिसॉर्ट बेजे गावातील असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीच्या बातमीवर दादा भुसे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. आता आदित्य ठाकरे काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आदित्य ठाकरे स्वतः गाडी चालवत नाशिकला आले
मंत्री दादा भुसे कुठलाही प्रशासकीय दौरा नसतांना अचानक मालेगाववरून नाशिकला आले होते. तर आदित्य ठाकरेंचा नाशिक दौरा खाजगी असल्याची सुरुवातीला माहिती होती. आदित्य ठाकरे स्वतः गाडी चालवत नाशिकला आले होते . विशेष म्हणजे आदित्य ठाकरे आणि दादा भुसे यांच्या भेटीची मोठ्या प्रमाणात गोपनीयता पाळण्यात आली. त्यामुळे आता या भेटीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

दादा भुसे यांच्याकडून वृत्ताचं खंडन
दरम्यान, दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांच्या भेटीच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. मी कौटुंबिक कारणासाठी नाशिकमध्ये आल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं. दादा भुसे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला  प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी संबंधित वृत्ताचं खंडन केलं. पण सूत्रांकडून, दादा भुसे आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

“मी या क्षणाला सुद्धा तुम्हाला माझं लोकेशन पाठवलं आहे. नाशिकमध्यल्या हॉटेलमध्ये आम्ही आमच्या नातीचा पहिला वाढदिवस साजरा करतोय. मालेगावला लहान मुलांच्या उपस्थितीत नातीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आम्हाला करायचा होता. पण पाऊस नसल्यामुळे पीकं करपायला लागली आहेत. त्यामुळे आम्ही कुटुंबापुरता वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं”, असं दादा भुसे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *