प्रवाशांचा वेळ वाचणार ! पुणे विभागात रेल्वेचा वाढणार वेग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑगस्ट । पुणे विभागात रेल्वेच्या स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम प्रगतिपथावर आहे. चिंचवड ते खडकी स्थानकादरम्यान हे काम पूर्ण झाले असून, पुढील तीन महिन्यांत पुणे स्थानकांपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर गाड्यांचा वेग वाढणार आहे. याचबरोबर एकाच वेळी अनेक गाड्या धावण्यास मदत होणार आहे.

पुणे विभागातील मेगा ब्लॉक घेऊन रेल्वेने नुकतेच चिंचवड ते खडकी स्थानकांदरम्यान १०.१८ किलोमीटरचे स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम पूर्ण केले. या भागात आता ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. यामुळे पुणे विभागातील लोणावळा ते खडकी हा ५४.३५ किलोमीटरचा भाग स्वयंचलित सिग्नलिंग क्षेत्र बनला आहे. खडकी ते पुणे या ६.२४ किलोमीटरच्या उर्वरित भागात ही यंत्रणा पुढील तीन महिन्यांत कार्यान्वित होईल. मुंबई ते लोणावळा या दरम्यान आधीच ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

चिंचवड ते पुणे विभागात स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा सुरू केल्याने गाड्या चालण्याचा वेळ कमी होईल. याचबरोबर गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक एक किलोमीटरच्या अंतरात एक गाडी लोहमार्गावर धावू शकते. ही यंत्रणा स्वयंचलित असून, त्यात मानवी हस्तक्षेप अजिबात नाही. या अद्ययावत यंत्रणेमुळे मानवी चुका टाळल्या जाणार असून, दुर्घटना घडण्याचा धोकाही कमी होणार आहे. या यंत्रणेत गाड्या आणि लोहमार्गांवर ऑक्झिलरी वॉर्निंग सिस्टीम ही प्रणाली बसविण्यात आली आहे. ती प्रणाली प्रत्येक सिग्नलवर गाडीचा सुरक्षित वेग निश्चित करेल. पिवळा दिवा ओलांडल्यानंतर गाडीचा वेग कमी करण्याची आणि मोटरमनने लाल दिव्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर आपत्कालीन ब्रेक लागू करण्याची प्रक्रिया या प्रणालीद्वारे होईल.

स्वयंचलित सिग्नल यंत्रणेत सिग्नलचे नियंत्रण फक्त धावत्या गाडीच्या हालचालीद्वारे होते. यात गाडीच्या पुढील सिग्नल १ किलोमीटर अंतरात आणि मागील सिग्नल १ किलोमीटर अंतरात गृहीत धरला जातो. त्यामुळे एकापाठोपाठ अनेक गाड्या एकाच वेळी धावू शकतात. – डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *