महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑगस्ट । कोविड घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना आज आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहावे लागणार आहे. या संदर्भातले समन्स त्यांना बजावण्यात आले आहेत. सूरज चव्हाण यांची यापूर्वी देखील ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. सूरज चव्हाण यांच्या चेंबूरमधील निवासस्थानी छापा देखील मारण्यात आला होता. आता आज मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा त्यांची किती तास चौकशी करते ते पाहावे लागेल.
त्यांचे शिवसेनेशी तसेच ठाकरे कुटूंबियांशी थेट संबंध असल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. सूरज चव्हाण यांची गेल्या महिन्यात देखील ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी देखील चौकशी केली होती.
काय आहे प्रकरण
मुंबई महापालिकेने लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट या कंपनीला कोरोना काळात कोविड सेंटरचे कंत्राट दिले होते. या कंपनीला या आधीचा कोणताही अनुभव नसताना आणि त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळही नसताना हे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कंपनीने बनावट कागदपत्रे दाखवून हे कंत्राट मिळवले होते. त्यात करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप या कंपनीवर करण्यात आला आहे. त्यामध्ये संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
बाळासाहेबांचा कट्टर कार्यकर्ता
शिवसेना व बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर कार्यकर्ता अशी सूरज चव्हाण यांची ओळख आहे. सर्वप्रथम वरळीतील शिवसेनेच्या शाखेपासून त्यांनी कामाला सुरूवात केली. त्यानंतर शिवसेना भवन व मातोश्री असा त्यांचा प्रवास आहे. आदित्य ठाकरेंनी युवा सेनेची स्थापन केल्यानंतर त्यांनी स्वत:ला युवा सेनेच्या कामात स्वत:ला झोकून घेतले. त्यामुळे लवकरच आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तींमध्ये त्यांनी स्थान मिळवले. आदित्य ठाकरे मातोश्रीबाहेर पडले की, सूरज चव्हाण त्यांच्यासोबत सावलीसारखे राहतात, असे शिवसैनिक सांगतात. एवढेच नव्हे तर आदित्य ठाकरेंचे शेड्यूलही सूरज चव्हाणच बनवत.