महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१६ मे ।। एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारपेठेत वाहनांची विक्रमी विक्री झाली असून, त्यात वार्षिक २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नव्या आर्थिक वर्षाची ही जोरदार सुरुवात आशादायी असल्याचे वाहनउत्पादकांची संघटना ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स’ने (सियाम) म्हटले आहे.
‘सियाम’च्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२४ मध्ये एकूण २१ लाख ३६ हजार १५७ वाहनांची विक्री झाली असून, एप्रिल २३ मध्ये ही संख्या १७ लाख १२ हजार ८१२ इतकी होती. प्रवासी वाहनांच्या विक्रीतही १.३ टक्क्यांनी वाढ झाली असून, यात युटिलिटी वाहनांची वाढती मागणी महत्त्वाची ठरली.
एप्रिल महिन्यात वाहन कंपन्यांनी तीन लाख ३५ हजार ६२९ प्रवासी वाहने वितरकांकडे दिली. गेल्या वर्षी याच महिन्यात (एप्रिल २०२३) हे प्रमाण तीन लाख ३१ हजार २७८ होते. युटिलिटी मोटारींच्या विक्रीमध्ये सर्वाधिक २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एप्रिलमध्ये एकूण एक लाख ७९ हजार ३२९ वाहनांची विक्री झाली, जी मागील वर्षीच्या याच महिन्यात एक लाख ४८ हजार ५ वाहनांची विक्री झाली होती. व्हॅनची विक्री गेल्या महिन्यात १५ टक्क्यांनी वाढून १२,०६० वाहनांवर पोहोचली असून, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये १०,५०८ व्हॅनची विक्री झाली होती.
दुचाकींची घाऊक विक्री गेल्या महिन्यात ३१ टक्क्यांनी वाढून १७ लाख ५१ हजार ३९३ वाहनांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ती १३ लाख ३८ हजार ५८८ होती. तीन चाकी वाहनांच्या विक्रीत देखील १४.५ टक्क्यांची वाढ झाली असून, एप्रिल २०२३ मधील ४२,८८५ वरून ती ४९,११६ वर पोहोचली आहे.
‘‘चालू आर्थिक वर्ष वाहन उद्योगासाठी आतापर्यंत सकारात्मक ठरले आहे. एप्रिल २०२३ च्या तुलनेत एप्रिल २०२४ मध्ये सर्वप्रकारच्या वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळातील जोरदार मागणीमुळे वाहनांची विक्री वाढली आहे.
समाधानकारक मान्सूनचा अंदाज, निवडणुकीनंतरचे धोरणात्मक सातत्य, उत्पादन आणि पायाभूत सुविधांवर सरकारचा भर यामुळे एकूणच आर्थिक विकासाला चालना मिळेल, पर्यायाने वाहनविक्रीलाही गती मिळेल,’’ असे ‘सियाम’चे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी सांगितले.