महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ मे । पुण्यामध्ये (Pune Crime) कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशामध्ये पुण्याच्या कोथरूड परिसरात ‘मुळशी पॅटर्न’सारखी (Mulshi Pattern) घटना घडली आहे. कोयत्याने भोसकून एका टोळीने तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे कोथरूड (Kothrud) परिसरात खळबळ उडाली आहे. अलंकार पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये एका टोळक्याने कोयत्याने सपासप करुन तरुणाची हत्या केली. सहा जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयता आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कोथरुड येथील डहाणूकर कॉलनीत गुरूवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळ कोथरूड परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
घटनेची माहिती मिळताच अलंकार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयामध्ये पाठवला. श्रीनू बिसलावत असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. एकमेकाकडे बघण्यावरुन आणि पूर्व वैमनस्यातून श्रीनूची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी फरार आहेत. अलंकार पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांच्या चार टीम रवाना झाल्या आहेत.