![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ मे । घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग पडून 16 जणांचा मृत्यू झाल्यानंतर अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे-सातारा महामार्गावरील होर्डिंगकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, टोल प्रशासन व पीएमआरडीए एकमेकांकडे बोट दाखवून दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अनधिकृत व धोकादायक होर्डिंग अजूनही तशीच आहेत. सातारा महामार्गावरील खेडशिवापूर टोलनाका ते सारोळापर्यंत सातारा बाजूला जवळपास 55 होर्डिंग तसेच सारोळा ते टोलनाकापर्यंत पुणे बाजूला जवळपास 43 होर्डिंग सेवारस्त्याला तसेच खासगी जागेवर आहेत.
जाहिरात फलक नियंत्रण अधिनियमानुसार रस्त्यांवर वाहनचालकांचे लक्ष विचलित होईल, तसेच 40 बाय 20 फुटांपेक्षा जास्त आकाराचे होर्डिंग उभारता येत नाहीत. परंतु, नियमांकडे दुर्लक्ष करत होर्डिंग उभारण्यात आली आहेत. दोन वर्षापूर्वी आलेल्या वादळात महामार्ग रस्त्यांवर असलेल्या होर्डिंगचे पत्रे उडाले होते. तर काही होर्डिंग पडले होते. त्यानंतर प्रशासनाने महामार्गावरील भल्यामोठ्या होर्डिंगकडे दुर्लक्षच केल्याचे दिसते. महामार्गावरील अनेक होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. संबंधित अधिकारी आणि होर्डिंग ठेकेदार यांच्या संगनमताने महामार्गावर अवाढव्य होर्डिंग उभारण्यात आल्याचा आरोप होत आहे.
