महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ मे । राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणूक 2024 बाबत अनेक भाकीतं केली आहेत. बंगाल, ओदिशा, तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र या राज्यांमध्ये भाजपला फायदा होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.बंगाल, ओदिशा, तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र या राज्यांमध्ये पक्षाच्या जागा वाढू शकतात, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे. भाजपला जवळपास 300 जागा मिळू शकतात, असंही ते म्हणाले आहेत.
प्रशांत किशोर यांनी आरटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “भाजपच्या कामगिरीबद्दल अनेक टिप्पण्या आणि वादविवाद सुरू असले तरी उत्तर आणि पश्चिमेतील भाजपच्या जागांमध्ये कोणतीही अर्थपूर्ण घट झाल्याचं मला दिसत नाही.”जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी यावेळी विरोधक मजबूत असल्याचंही वक्तव्य केलं आहे. मात्र, त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला विजयाचा दावेदार म्हणून संबोधलं आहे.
पश्चिम बंगाल, ओदिशा, तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये भाजपला पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळतील, असंही ते म्हणाले आहेत.
या लोकसभा निवडणुकीतील एनडीए आघाडीच्या कामगिरीबाबत प्रशांत किशोर म्हणाले की, एनडीएनं 400 जागा जिंकल्याचा भाजपचा दावा योग्य ठरलेला दिसत नाही.प्रशांत किशोर म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष कमकुवत नाही. पण, भाजपच्या विरोधात निवडणूक लढणारे पक्ष कमकुवत दिसू शकतात. 370 जागांचा आकडा ओलांडण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या याआधीच्या वक्तव्यांचा विचार केला, तर प्रशांत किशोर यांनी भाजपच्या जागांचा आकडा याच्याच आसपास असेल असं म्हटलं आहे.
भाजपला 400 जागांचा टप्पा गाठता येणार नाही, पण 200 जागांच्याही मोठ्या घसरणीचा सामनाही करावा लागणार नाही, असा पुनरुच्चारही यावेळी बोलताना प्रशांत किशोर यांनी केला. गुरुवारी (16 मे 2024) जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी माय-बाप (MY-BAAP) समीकरणाबद्दल बोलणाऱ्या तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला होता. प्रशांत किशोर यांनी केवळ तेजस्वी यादव यांच्यावर हल्लाच केला नाही तर कोणते समीकरण उपयोगी पडणार आहे, हेही सांगितलं आहे.
