Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला VIDEO

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ मे ।। चाकण-शिक्रापूर मार्गावर गँस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला असून अनेक घरांची पडझड झाली आहे. मोहितेवाडी परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घरांची पडझड झाल्याने मोठं नुकसान झालं आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. टँकरचा स्फोट झाल्याने परिसरात उभ्या असलेल्या इतर वाहनांना आग लागली होती.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. टँकरमधून गॅस गळती झाल्याने आग लागून हा स्फोट झाल्याची प्राथामिक माहिती आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाकण-शिक्रापूर मार्गावरील मोहितेवाडी परिसरात एक जेवणाचा ढाबा आहे. या ढाब्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. रविवारी पहाटे या ढाब्यासमोर एक गॅस टँकर उभा होता.

अचानक या टँकरला आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. क्षणार्धात गॅस टँकरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे जवळपास एक किलोमीटरपर्यंत जाणवले. कानठळ्या बसणारा आवाज झाल्याने नागरिक चांगलेच धास्तावले.

गॅसच्या स्फोटाने महामार्गालगत असलेल्या अनेक घरांच्या काचा फुटल्या. तसेच काही घरांची पडझड देखील झाली. मात्र, सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. सध्या पोलिसांकडून घटनेचा तपास केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *