महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ मे ।। पुणे मेट्रोमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी. पुणे मेट्रोमधून आता फक्त १०० रुपयांमध्ये दिवसभर प्रवास करता येणार आहे. मेट्रो प्रशासनाकडून ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे पुणेकरांना कमी पैशात मेट्रो प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे.
पुणेकरांनी मेट्रोला भरभरुन प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाकडून पुणेकरांसाठी नवनवीन सुविधा देण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मेट्रोने पुणेकरांसाठी दैनंदिन पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.यामुळे दिवसभरात अवघ्या शंभर रुपयात मेट्रोने प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
मेट्रोने प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने दिवसभरासाठी एकच शंभर रुपयाचा पास काढला तर तो दोन्ही मार्गांवर अमर्यादित प्रवासाची सुविधा त्यांना मिळणार आहे. पुणे मेट्रोने लाखो प्रवासी दररोज प्रवास करत आहेत. या प्रवाशांना पिंपरी- चिंचवडमार्गे अर्ध्या तासांत पुणे स्टेशन, येरवडा, वनाजपर्यंत जाता येते.
मेट्रो प्रशासनाने या पासची किंमत प्रति व्यक्ती 100 रुपये निश्चित केली आहे. एकदा हा पास घेतला की तो परत करता येत नाही. तसेच, सर्व लोकांसाठी या पासची किंमत 100 रुपयेच आहे. हा पास खरेदी केल्यानंतर त्या व्यक्तीला मेट्रोने अमर्याद प्रवास करता येऊ शकतो.