महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ मे ।। मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. पण केवळ मी साहेबांचा मुलगा नाही, म्हणून मला संधी मिळाली नाही ; हा कोणता न्याय ? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. शिरूरमधल्या सभेत बोलताना त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली होती, त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया देताना अजित पवार यांची ओरड ही निरर्थक असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत भाष्य केलं आहे.
शरद पवार मुलाखतीवेळी बोलताना म्हणाले, ‘अजित पवार माझ्यावर अन्याय झाला अशी भावना आता व्यक्त करत आहेत. ‘मी शरद पवारांच्या पोटी जन्माला आलो – असतो तर’ वगैरे भाषा करीत आहेत. कुटुंबप्रमुख म्हणून मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यात कधीही भेद केला नाही, असं शरद पवारांनी बोलताना म्हटलं आहे.
‘अजित पवारांना पक्षाने काय कमी दिलं? उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद अशी विविध पदे दिली. सुप्रिया सुळे या चार वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र लोकसभेपुरतेच सीमित होते. विधिमंडळ पक्षनेते म्हणून अजित पवारांकडे राज्याची सूत्रे होती. एवढे सारे होऊनही पक्षात मला काम करण्यास संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक आहे, असे पवारांनी सुनावलं’, असंही पुढे शरद पवार म्हणालेत.
मुख्यमंत्रिपदासाठी कोणीही योग्य नेता नव्हता
सर्वाधिक आमदार निवडून येऊनही २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची संधी घालविली, अशी टीका केली जाते याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, तो निर्णय फार विचारपूर्वक घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्याचा प्रश्नच नव्हता. कारण ते फारच नवखे होते. मुख्यमंत्रीपदासाठी कोणी योग्य नेता आमच्याकडे नव्हता. छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती. यामुळेच अधिकची मंत्रिपदे व खाती मिळवून मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे कायम ठेवण्याच्या निर्णयावर आम्ही आलो होते.