महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – :दि.२५- मुंबई :निक कमॉडिटी बाजारात बुधवारी सोन्याचं किमती ०.४ टक्क्यांनी वधारून ४८४२० रुपयांवर गेल्या. कमॉडिटी बाजारातला हा आतापर्यंतचा सार्वकालीन उच्चांकी दर ठरला आहे. याआधी ४८२८९ रुपयांचा रेकॉर्ड होता. चांदीमध्ये मात्र घसरण झाली असून चांदीचा एक किलोचा भाव ४८७१६ रुपये आहे. आजच्या सत्रात देखील सोने तेजीत राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
जागतिक बाजारात मंगळवारी स्पॉट गोल्ड (SpotGold) ०.२ टक्क्याने वाढून १७६९.५९ डॉलर प्रती औंस झाले. २०१२ नंतरची जागतिक बाजारातील सोन्याची सर्वाधिक किंमत आहे. यापूर्वी २०१२ मध्ये १७७३ डॉलर प्रती औंस इतकी होती. आर्थिक पॅकेजच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत चालू वर्षात १६ टक्के वाढ झाली आहे.
करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने बड्या देशांमधील केंद्रीय बँकांनी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आर्थिक पॅकेजची तयारी सुरु केली आहे. परिणामी भांडवली बाजारातील संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांनी गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी बदलली आहे. संस्थात्मक गुंतवणूकदार मौल्यवान धातूला गुंतवणुकीसाठी पसंत करत आहेत. महागाई आणि चलनातील अवमूल्यनाला हेजिंगचा भक्कम पर्याय म्हणूनदेखील सोने गुंतवणूकदारांना वरदान ठरत आहे.