महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – सोलापूर – महात्मा फुले जनआरोग्य योजना ही देशातील आपल्या राज्याने राबवलेली मोठी फ्लॅगशिप योजना आहे. या योजनेत 977 प्रकारच्या आजारांना कॅशलेस उपचार केले जातात. मात्र लक्षणे नसलेल्या रुग्णांवर कोणतेही उपचार केले जात नाहीत. त्यांची फक्त काळजी घेतली जाते त्यामुळे या योजनेचा फायदा रुग्णांना मिळत नसेल. मात्र जर या योजनेत त्रुटी असतील तर रुग्णालयांकडून माहिती मिळवून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोलापुरातील कोरोनाविषयक घेतलेल्या आढाव्याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सोलापुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याविषयी आरोग्यमंत्र्यांनी देखील या बैठकीत चिंता व्यक्त केली. राज्यात सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या शहरांपैकी सोलापूर हे देखील आहे. सोलापूर शहरात जवळपास 11.22 टक्के इतका मृत्यूदर आहे. हे मृत्यूदर कमी करण्यासाठी सुचना दिले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सोलापुरात मृत्यूदर हे जास्त असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील जास्त आहे. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी कोमॉर्बीड (इतर आजार असलेले) रुग्ण हे जवळपास 83 टक्के इतके आहेत. तर 17 टक्के रुग्ण हे फक्त कोरोनामुळे दगावले आहेत. सोलापुरातील डबलिंग रेट हा 22 दिवस असल्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.